भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालक पसार, राष्ट्रभूषण चौकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:00 IST2025-09-12T19:59:51+5:302025-09-12T20:00:03+5:30
खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली, अपघातानंतर वाहनचालक पसार झाला

भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालक पसार, राष्ट्रभूषण चौकातील घटना
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बळीराम साहेबराव चव्हाण (२१, रा. पांगरी, बदनापूर, जि. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राम साहेबराव चव्हाण (२३) यांनी खडक पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बळीराम छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून गुरुवारी (दि. ११) पहाटे चारच्या सुमारास निघाला होता. खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव कारने दुचाकीस्वार बळीराम याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या बळीरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.