उन्हाने हैराण नागरिकांना लवकरच दिलासा; मान्सून आज अंदमानात अन् ३१ मे रोजी केरळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:08 IST2024-05-19T13:07:55+5:302024-05-19T13:08:32+5:30

यंदा चांगला पाऊस होण्याचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत

Soon relief to the heat stressed citizens Monsoon in Andaman today and Kerala on 31st May | उन्हाने हैराण नागरिकांना लवकरच दिलासा; मान्सून आज अंदमानात अन् ३१ मे रोजी केरळात

उन्हाने हैराण नागरिकांना लवकरच दिलासा; मान्सून आज अंदमानात अन् ३१ मे रोजी केरळात

पुणे : उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार असून, मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार आहे. केरळमध्ये ताे ३१ मे रोजी येईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. यंदा चांगला पाऊस होईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला ४ दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ मे ते ३ जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी २१ मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे रोजी मान्सून आला होता. मात्र केरळमध्ये ९ दिवस उशिराने म्हणजे ८ जूनला पोचला. यंदा त्यात काही बदल होतो का ते पाहावे लागणार आहे.

‘ला निना’मुळे काय होणार?

गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ‘अल निनो’दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंतचा इतिहास आहे.

महाराष्ट्रात कधी येणार?

केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार? याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे. गेल्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात येताना खूप उशीर झाला होता. त्यामुळे यंदाही तसेच होणार की वेळेवर येणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे रविवारी मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी योग्य वातावरण राहील. - डाॅ. अनुमप कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्रज्ञ

Web Title: Soon relief to the heat stressed citizens Monsoon in Andaman today and Kerala on 31st May