काही गोष्टी केल्या अन् दर्जा घसरला; पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी सांगितली नेमकी कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:37 IST2025-09-25T12:37:08+5:302025-09-25T12:37:57+5:30
सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नकारात्मक मार्क पद्धती असून दरम्यानच्या काळात विद्यापीठाकडून कारण नसताना काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्याचा फटका बसला

काही गोष्टी केल्या अन् दर्जा घसरला; पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी सांगितली नेमकी कारणे
पुणे : एनआयआरएफ या राष्ट्रीय मानांकनात सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाची घसरण हाेण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नकारात्मक मार्क पद्धती. दरम्यानच्या काळात विद्यापीठाकडून कारण नसताना काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्याचा फटका बसला. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर दर्जाहीन संशोधन पेपरचा देता येईल. ज्यात ५०० पैकी ४९५ संशोधन पेपर बाद ठरवली गेली. ज्याचे नकारात्मक मार्क वाट्याला आले आहेत, असे मत सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि माजी कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
आपण निधी देताे तर कॉलेजेसनी त्यांच्या मॅगझिनमध्ये विद्यापीठाचा नामाेल्लेख का करू नये, असा प्रश्न कुणी तरी उपस्थित केला असणार आणि त्यावरून नामाेल्लेख करण्याच्या सूचना दिल्या असणार, असेही ते म्हणाले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एनआयआरएफ विषयक चर्चा सत्रात ते बाेलत हाेते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डी. बी. पवार, प्रा. श्यामराव लवांदे, राजेश पांडे आदी उपस्थित होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. गजानन एकबोटे होते. सह कार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह श्यामकांत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. गजानन एकबोटे म्हणाले की, विद्यापीठाचे मानांकन चांगले ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. कारण, विद्यापीठाचा दर्जा घसरल्याने मार्केटमधील संस्थेचे स्थान घसरणार, पर्यायाने प्लेसमेंट घटणार, प्रवेशही कमी हाेणार आणि याचे दूरगामी परिणाम सर्वांना भाेगावे लागणार आहेत. विद्यापीठाचे मानांकन घसरण्यात अनेक कारणांसह उदासीनता आणि अज्ञान हेदेखील कारणीभूत आहे. या सर्वांची दखल घेत उपायांबाबत चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. डॉ. डी. बी. पवार यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या संख्येतील तफावतीकडे लक्ष वेधले. संलग्न महाविद्यालय देखील जबाबदार असल्याचे भाष्य केले.
डॉ. उमराणी म्हणाले की, मानांकन दर वर्षीच होत असते, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. यात २०१६ साली सहभागी झालेल्या संस्था ३२६५ हाेत्या, त्या २०२५ मध्ये १४ हजार १६३ झाल्या आहेत. रँकिंग पद्धतीमुळे एक निश्चित झाले, ते म्हणजे डेटा गव्हर्नर कल्चर आले. टीचिंग-लर्निंग, संशोधन, पब्लिकेशन, प्लेसमेंट, पर्सेप्शन यावर भर दिला पाहिजे. आपण शेअर होल्डर न हाेता स्टेट होल्डर बनून काम करू.
खासगी विद्यापीठांत कायमस्वरूपी प्राध्यापक नसतात, तरीही ते पुढे आहेत. कारण, ते सादरीकरणात आघाडीवर आहेत. याची दखल घेत सादरीकरणात सुधारणा करणे, आंतरराष्ट्रीय शिक्षकांची संख्या वाढवणे, व्यक्तिगत संशोधनाला प्राेत्साहन देणे, सुसंवाद वाढवणे, दृष्टिकोन सुधारणे, अभ्यासक्रम कालसुसंगत करणे, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस वाढवणे यासह स्केल-स्पीड-स्कोप या गोष्टीवर काम केले पाहिजे. यातून मनुष्यबळ उपलब्ध होईलच, शिवाय निधीदेखील मिळेल. रँक कमी- जास्त होत राहील; पण संवाद आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. - डाॅ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू