वाहतूक कोंडी सोडवा, कारणे सांगू नका; रुपाली चाकणकरांनी पोलिसांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:04 IST2025-12-04T14:04:34+5:302025-12-04T14:04:52+5:30
रस्त्यावरच वाहने पार्क करणे, मनमानी पद्धतीने रिक्षा उभी करणे आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे.

वाहतूक कोंडी सोडवा, कारणे सांगू नका; रुपाली चाकणकरांनी पोलिसांना सुनावले
धायरी : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात जीवघेण्या वाहतूककोंडीच्या समस्येची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली. बुधवारी सकाळी त्यांनी थेट घटनास्थळी धडक देत परिस्थितीची पाहणी केली. 'कोणतीही कारणे नकोत, तातडीने उपाययोजना करा!'' अशा शब्दांत पालिका आणि पोलिस प्रशासनाला सुनावले.
रूपाली चाकणकर यांनी बुधवारी सकाळी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय वाघमोडे, सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. प्रयेजा सिटीकडून येणाऱ्या वाहनांचा लोंढा, बेशिस्त रिक्षा चालक, अस्ताव्यस्त पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांमुळे या चौकात रोज नरकयातना सुरू आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत चाकणकर यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
रिक्षा स्टँडला परवानगी कुणी दिली? मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांना लगाम घाला, आकाशचिन्ह विभागाकडून सतत कारवाई का होत नाही, रस्त्यावरील अनधिकृत जाहिरातबाजी आणि अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का होतेय. महापालिकेला पत्र देऊनही कामे होत नसतील तर ही दिरंगाई आता चालणार नाही. कोणतीही कारणे न देता तत्काळ या समस्या सोडवा. रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बसू देऊ नका. त्यांच्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर भाजी मंडई पुलाखाली सुरू करा आणि रस्त्यावरची अतिक्रमणे हटवा'' असेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
'ढिसाळ प्रशासनाचे बळी ठरतोय सामान्य माणूस!
चाकणकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. नागरिकांचे दररोजचे हाल पाहता प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. कामावर जाणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ या कोंडीत वाया जात आहे. रस्त्यावरच वाहने पार्क करणे, मनमानी पद्धतीने रिक्षा उभी करणे आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे.