...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:45 IST2025-06-25T09:45:02+5:302025-06-25T09:45:21+5:30

बाबर यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

...So the reason behind former MLA Mahadev Babar's entry into Ajit Pawar's faction has come to light! | ...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बाबर यांच्या पक्ष प्रवेशाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हडपसर हा मतदारसंघ महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसाठी सर्वाधिक यशस्वी ठरलेला असून, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकट्या हडपसर मतदारसंघातून 17 ते 18 नगरसेवक निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतरही अजित पवार यांच्या गटाने या मतदारसंघावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.

ही घटना शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानली जात असून, विशेष म्हणजे याच मतदारसंघातून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे येतात. त्यांच्या मतदारसंघातूनच अशा महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने, प्रशांत जगताप यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जातो.

... म्हणून केला राष्ट्रवादीत प्रवेश 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर हे नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर महादेव बाबर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती, पण अखेर महादेव बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

Web Title: ...So the reason behind former MLA Mahadev Babar's entry into Ajit Pawar's faction has come to light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.