बहिणीच्या प्रियकराचा पुण्यात खून; पळून गेलेल्या भावासह दोघांना नांदेड येथून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:33 IST2025-12-25T13:29:30+5:302025-12-25T13:33:10+5:30
बहिणीचे प्रेमसंबंध भावाला मान्य नसल्याने त्याने भररस्त्यात प्रियकराचा खून केला होता

बहिणीच्या प्रियकराचा पुण्यात खून; पळून गेलेल्या भावासह दोघांना नांदेड येथून अटक
पुणे: बहिणीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने तिच्या प्रियकराचा खून करून नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पळून गेलेल्या दोघांना पुणेपोलिसांनी पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आहे. संदीप रंगराव भुरके ( वय -28 वर्ष रा भोकर जि नांदेड) आणि ओमकार गणेशराव किरकन (वय 24 वर्ष रा भोकर जि नांदेड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही आता पुण्याच्या दिशेने आणले जात आहे. जावेद खाजामियां पठाण (वय ३४, सध्या रा. नऱ्हेगाव, मूळ रा. मुदखेड रोड, ख्वाजा नगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यातील आरोपी संदीप भुरके याची बहीण आणि मयत जावेद यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होते. दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीचा भाऊ संदीप भुरके याला मान्य नव्हते. यातच जावेद याने प्रेयसीला पळवून पुण्यात आणले आणि नऱ्हे परिसरात एकत्र राहू लागले.
बहिण मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग संदीप भुरकेच्या मनात खदखदत होता. बहिण पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप भुरके एका साथीदारासह पुण्यात आला. जावेद ज्या ठिकाणी राहत होता, त्या ठिकाणी जाऊन त्याने जावेदशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संदीपने धारदार शस्त्राने जावेदवर वार केले. डोक्यावर आणि इतर ठिकाणी गंभीर जखमी झाल्याने जावेद जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ससून रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
इकडे पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी एक टीम स्थापन केली होती. परिसरातील CCTV आणि तांत्रिक तपास करत आरोपीचा माग काढला. दोघेही नांदेड जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याची माहिती समोर आली. आणि त्यानंतर आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने दोघांनीही शिताफीने ताब्यात घेतले.