सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:13 IST2024-12-17T14:12:47+5:302024-12-17T14:13:21+5:30
युवक दिवसाला १८० ते २०० किमी प्रवास करत असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू आणि नेपाळ असा 2034 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला

सिंहगड ते नेपाळ सायकल सफर; २०३४ किमी अंतर केवळ ११ दिवसांत फत्ते
धनकवडी: नरवीर तानाजी मालुसरे सिंहगडावर स्वराज्य रक्षणासाठी धारातीर्थ पडले. परंतु आजही त्यांच्या पराक्रमाचा वारसा आजची तरुणाई तितक्याच श्रद्धेने जपते, याचा प्रत्यय नुकताच आला. पुण्याच्या युवकांनी सिंहगड ते नेपाळमधील पशुपतीनाथ ही तब्बल २०३४ किलोमीटर अंतराची मोहीम सायकलवरून केवळ ११ दिवसात फत्ते केली आणि नेपाळच्या पशुपती मंदिरात आपल्या पराक्रमाचा सिंहनाद केला.. गिर्यारोहक कृष्णा मरगळे, लोकेश नाईलकर आणि मयूर तांबे या तिघांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.
धावत्या युगात इंधनावर चालणारी वाहने आणि होणारे वायुप्रदूषण यांमुळे शहरांचा जीव घुटमळत आहे. यामुळे ही मोहीम सायकलवरून पूर्ण करून पुण्यातील या तिघांनी मिळून पुण्यनगरीतील तरुणाई आणि समाजा समोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.
या मोहिमेमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, काठमांडू नेपाळ हा असा एकूण 2034 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. हे युवक दिवसाला 180 ते 220 किलोमीटरवरचा प्रवास करत होते, जिथे रात्र होईल तिथे स्वतः तंबू लावून राहायचे आणि पहाट झाली की पुढच्या प्रवासाला निघायचे. मजल दर मजल करत पुढे जायचं... सायकल चालवून भूक लागली की, मोकळी जागा पाहून स्वतः च्या हाताना स्वयंपाक करायचा आणि जेवण करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची असा खडतर प्रवास त्यांनी अकरा दिवस केला.
२०३४ किलोमीटर सायकल मोहीमेत वेग वेगळ्या ठिकाणी नवनवीन माणसं भेटली, अनोळखी प्रांतातले चांगले वाईट असंख्य अनुभवांची शिदोरी घेऊन तिघेही हि परत पुण्यात सुखरूप परतलो असे कृष्णा मरगळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
मला वाटतं सायकलिंग आयुष्याला एक नवा अर्थ देते व जीवनात निश्चयाचे बळ देते मग बरोबर सायकल असो वा नसो. सायकलप्रमाणे माणसाचे आयुष्य हे तोल साधणारे व सदैव क्रियाशील असते, हेच खरे. असं हि मरगळे म्हणाले.