सिग्नल तोडणे, भाडे नाकारणे; अवैध रिक्षा चालकांवर धडक कारवाई, पुण्यात हजारहून अधिक रिक्षाचालकांना ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 20:04 IST2025-11-28T20:02:43+5:302025-11-28T20:04:43+5:30
शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले

सिग्नल तोडणे, भाडे नाकारणे; अवैध रिक्षा चालकांवर धडक कारवाई, पुण्यात हजारहून अधिक रिक्षाचालकांना ठोठावला दंड
पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर वाहतूक विभागाने अवैध व नियमबाह्य रिक्षांवर कारवाईला सुरूवात केली आहे. १० ते २६ नोव्हेंबर या १७ दिवसांच्या कालावधीत वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने तब्बल १ हजार ८७ रिक्षांवर कायदेशीर कारवाई केली आहे. वाहतूक विभागाने १ अधिकारी आणि ४ कर्मचाऱ्यांचे पथक या मोहिमेसाठी नियुक्त केले होते.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचे तपशील पुढीलप्रमाणे...
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे – २३४
- नो पार्किंगमध्ये रिक्षा लावणे / वाहतुकीस अडथळा – ९२
- फ्रंट सीटचा नियमभंग – ३६
- युनिफॉर्मशिवाय रिक्षा चालवणे – ४२४
- कागदपत्रे जवळ न ठेवणे – १६
- सिग्नल उल्लंघन – १६
- अनधिकृत रिक्षा स्टँडवर रिक्षा उभी करणे – ३८
- राँग साईडने वाहन चालवणे – ३६
- भाडे नाकारणे – १३८
- इतर विविध उल्लंघने – ५७
शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. तसेच रिक्षा चालकांनी निर्धारित रिक्षा स्टँडवरच थांबावे, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग टाळावे, सिग्नल व लेन शिस्त पाळावी, प्रवाशांशी नम्र व प्रामाणिक वर्तन करावे, मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. याशिवाय वाहतूक शाखेकडून यापुढेही अशीच कारवाई सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.