Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' मधील श्याम कालवश; ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन
By नम्रता फडणीस | Updated: May 7, 2025 11:56 IST2025-05-07T11:55:54+5:302025-05-07T11:56:59+5:30
Madhav Vaze Death: रंगभूमीच्या क्षेत्रात त्यांनी दिग्दर्शक, नाट्य गुरु व नाट्य समीक्षक यामाध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला

Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' मधील श्याम कालवश; ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन
पुणे : आचार्य अत्रे यांच्या ' श्यामची आई' राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते, माधव वझे यांचे बुधवारी ( दि. ७) खासगी रुग्णालयात निधन झाले. रंगभूमीच्या क्षेत्रात त्यांनी दिग्दर्शक, नाट्य गुरु व नाट्य समीक्षक यामाध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. मात्र माधव वझे यांच्या 'श्याम' च्या भूमिकेने लोकांच्या मनात इतके घर केले की त्यांची 'श्याम' ही ओळख शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, अभिनेता - दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे.
माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी पुण्यात झाला. वझे हे पुण्याच्या वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांनी रौप्य पदके मिळविली होती. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते. हे नाटक २०१३ साली रंगमंचावर आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन देखील केले. कला अकादमी (गोवा) येथील नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. नाट्य संघाच्या देश-परदेशातील अधिवेशनामध्ये शोधनिबंध सादर केले.
माधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट
* डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट, २०१६)
* थ्री इडियट्स (हिंदी चित्रपट, २००९)
* श्यामची आई (बालनट, १९५३)
माधव वझे यांची पुस्तके
* प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन - माधव वझे)
* रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे)
* श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी (आठवणी)
* नंदनवन (मुलांसाठी)
* समांतर रंगभूमी - पल्याड- अल्याड
* पुरस्कार
* रंगमुद्रा (अनेक नाट्यकर्मींची व्यक्तिचित्रणे) या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार
* प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन - माधव वझे) या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार
* श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी (आठवणी) - पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार
* समांतर रंगभूमी - पल्याड- अल्याड
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
* नगर वाचन मंदिर, पुणे