कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार! एका कर्मचाऱ्याच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:21 IST2021-08-26T16:21:39+5:302021-08-26T16:21:47+5:30
कारशेडमध्ये काही ठिकाणी सापडली काडतुसे

कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार! एका कर्मचाऱ्याच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी
पुणे : कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या एकाच्या दंडाला गोळी चाटून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजयकुमार (वय २५, रा बिहार) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना कोथरुडमधील कारशेडमध्ये बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या कर्मचार्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो कार शेडच्या उभारणीचे काम सुरु आहे. बुधवारी सायंकाळी दोन कामगार वेल्डिंगचे काम करत होते. यावेळी वेल्डिंगचे काम करत असताना कामगाराच्या दंडाला गोळी चाटून गेली. त्यावेळी तेथे काही काडतुसे सापडल्याचे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले असून ही काडतुसे कोथरुड पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहेत. ही काडतुसे येथे कशी आली, याचा तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.