पुण्यात रिक्षा वळविण्याच्या किरकोळ वादातून गोळीबार; ४ आरोपी अटकेत, पिस्तूल व दुचाकी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:35 IST2026-04-11T12:34:14+5:302026-04-11T12:35:11+5:30
रिक्षा वळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी धारदार शस्त्र आणि पिस्तूलाचा वापर करून फिर्यादीवर गोळीबार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला

पुण्यात रिक्षा वळविण्याच्या किरकोळ वादातून गोळीबार; ४ आरोपी अटकेत, पिस्तूल व दुचाकी जप्त
पुणे : रिक्षा वळविण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याची घटना कोंढव्यात घडली असून, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना कोंढवा पोलिसांनीअटक केली आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दुचाकी असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुणाल ऊर्फ नन्या विनायक जाधव (वय १९, रा. काकडे वस्ती, कोंढवा), आदित्य शंकर घावरे (वय २१, रा. दबाडी रोड, वडगाव बुद्रूक), अक्षय ज्ञानेश्वर आवळे (वय २०, रा. जाधवनगर, वडगाव), आणि शिवाजी पांडुरंग मरगळे (वय २१, रा. गणपती मंदिराजवळ, शिवतेज नगर, कोल्हेवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार आणि आरोपी यांच्यात ८ मार्च रोजी कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरात रिक्षा वळविण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी धारदार शस्त्र आणि पिस्तूलाचा वापर करून फिर्यादीवर गोळीबार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे आणि पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. १० मार्च रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिस अंमलदार संतोष बनसुडे यांना कुणाल जाधव हा आपल्या साथीदारांसह पारशी ग्राऊंड, शिवनेरीनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दुचाकी जप्त करण्यात आली.