पुण्यातील धक्कादायक घटना! आर्थिक वादातून युवतीचा तीक्ष्ण हत्याराने खून, युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:21 IST2025-01-08T09:21:22+5:302025-01-08T09:21:30+5:30
युवतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी झाली, आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

पुण्यातील धक्कादायक घटना! आर्थिक वादातून युवतीचा तीक्ष्ण हत्याराने खून, युवकाला अटक
लोहगाव : आर्थिक वादातून एकाच आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवकाने सहकारी युवतीवर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्यात युवतीचा खून झाल्याची घटना येरवड्यातील रामवाडी येथे घडली. शुभदा शंकर कोदारे (वय 28, रा. बालाजीनगर, कात्रज पुणे) हिचा खून झाला असून आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजी (वय 28, रा. खैरेवाडी, शिवाजी नगर, पुणे) याला येरवडापोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवाडी येथिल WNS कॉल सेंटर इमारतीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याच ठिकाणी काम करणाऱ्या कृष्णा कनोजा याने त्याच्या ओळखीच्या शुभदा कोदारे हिच्या उजव्या हाताच्या कोपरावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्यात गंभीर जखमी शुभदाला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. येरवडा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. उसने दिलेल्या पैशाच्या वादावरून हा गुन्हा केल्याची माहिती आरोपी कृष्णा याने पोलिसांना दिली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके व सहायक पोलीस अधिकारी करीत आहेत.