Parth Pawar on VSR Ventures: ज्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या विमान अपघातात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले, त्याच कंपनीच्या विमानातून त्यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला रोहित पवार या कंपनीविरोधात रान उठवत असताना पार्थ पवारांच्या या प्रवासामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावर आता खुद्द पार्थ पवारांनी स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकी घटना काय?
पुण्याच्या मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत एका स्नेहभोजनाचे आणि महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तातडीने पोहोचण्यासाठी पार्थ पवार यांनी मुंबई ते पुणे असा विमान प्रवास केला. मात्र, हा प्रवास त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने केल्याचे समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. २८ जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांचा जीव गेला होता, त्या घटनेला तीन महिने पूर्ण होत असतानाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा आणि पार्थ यांचा 'योगायोग'
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर सातत्याने व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपाताची शक्यता असल्याचे म्हणत त्यांनी मंगळवारीच पुणे सीआयडी कार्यालयात पुरावे सादर केले. त्यानंतर दुपारीच पार्थ पवार हे व्हीएसआरच्या विमानाने पुण्यात आले.
'ती केवळ प्रशासकीय चूक'; पार्थ पवारांचे स्पष्टीकरण
वाढता वाद पाहून पार्थ पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या प्रवासाचे समर्थन न करता ती एक तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. "मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारी वर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत," असं पार्थ पवार म्हणाले.
"व्हीएसआर Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही," असेही पार्थ पवार म्हणाले.
काय आहे 'व्हीएसआर' वाद?
२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ व्हीएसआरचे विमान कोसळून अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. रोहित पवारांसह जय पवार यांनीही कंपनीच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले होते. एका व्हिडिओमध्ये पायलटच्या सीटवर कंपनी मालकाचा मुलगा झोपलेला असल्याचा पुरावा जय पवारांनी दिला होता. रोहित पवारांच्या तक्रारीनंतर डीजीसीएने या कंपनीची पाच लिअर जेट विमाने यापूर्वीच ग्राउंड केली होती.
Web Summary : Parth Pawar traveled on a VSR Ventures plane, sparking controversy due to a prior accident involving the company. Rohit Pawar criticized VSR, while Parth cited an administrative error and apologized, promising increased vigilance to prevent recurrence.
Web Summary : पार्थ पवार ने वीएसआर वेंचर्स के विमान से यात्रा की, जिससे विवाद खड़ा हो गया क्योंकि कंपनी पहले एक दुर्घटना में शामिल थी। रोहित पवार ने वीएसआर की आलोचना की, जबकि पार्थ ने एक प्रशासनिक त्रुटि का हवाला दिया और पुनरावृत्ति को रोकने के लिए सतर्कता बढ़ाने का वादा किया।