Sonam Raghuvanshi Gets Bail: देशभर गाजलेल्या इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत वादग्रस्त वळण मिळाले आहे. गेल्या ११ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी हिला मेघालय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन पुराव्यांअभावी नाही, तर चक्क पोलिसांच्या एका तांत्रिक घोळामुळे मिळाला आहे. या निर्णयामुळे पीडितांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.
न्यायालयाने जामीन देताना पोलिसांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. सोनमच्या अटकेशी संबंधित सर्व कागदपत्रे,अटक मेमो, केस डायरी आणि अधिकारांची सूचना यामध्ये पोलिसांनी चक्क अस्तित्वात नसलेल्या कलम ४०३(१) चा उल्लेख केला होता. न्यायालयाने सांगितले की, भारतीय न्याय संहितेत असे कोणतेही कलम अस्तित्वातच नाही.
कोणत्याही आरोपीला आपण कोणत्या गुन्ह्याखाली अटकेत आहोत हे जाणून घेण्याचा अधिकार असतो. अस्तित्वात नसलेले कलम लावल्यामुळे आरोपीच्या अधिकारांचे हनन झाले असून, ही अटकच बेकायदेशीर ठरते, असे न्यायालयाने नमूद केले. सोनमला अटकेनंतर सुरुवातीच्या काळात कायदेशीर सल्ला किंवा वकील उपलब्ध करून दिल्याचे कोणतेही पुरावे रेकॉर्डवर नाहीत, असेही कोर्टाने निदर्शनास आणले.
"कानून अंधा होता है, हे आज पटले"; रघुवंशी कुटुंबाचा आक्रोश
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मृतक राजा रघुवंशीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करत आपला संताप व्यक्त केला. "माझा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे. या प्रकरणात पैशांचा मोठा खेळ झाला आहे," असा खळबळजनक आरोप राजाची आई उमा रघुवंशी यांनी केला.आम्ही चित्रपटात ऐकायचो की कायदा आंधळा असतो, पण आज आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला, अशी भावना राजाचा भाऊ सचिनने व्यक्त केली.
दुसरा भाऊ विपिन रघुवंशी याने सांगितले की, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीला फायदा झाला आहे आणि या जामिनाविरुद्ध आम्ही तातडीने उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
नेमकी घटना काय होती?
मे २०२५ मध्ये इंदौरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याचे सोनमशी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दोघे मेघालयाला हनीमुनसाठी गेले. त्यानंतर २३ मे २०२५ रोजी राजा अचानक बेपत्ता झाला. २ जून रोजी चेरापूंजी येथील एका खोल दरीत राजाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ८ जून रोजी सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. तपासात तिनेच सुपारी देऊन पतीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
जामिनानंतरच्या अटी
जामीन मिळाला असला तरी सोनमला तातडीने सुटका मिळणार नाही. तिला शिलाँग जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून, पुढील चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एका मोठ्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांच्या किरकोळ वाटणाऱ्या मोठ्या चुकीमुळे जामीन मिळाल्याने संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा होत आहे.
Web Summary : Sonam Raghuvanshi, accused of her husband's murder, was granted bail due to a police error in citing a non-existent legal clause. The court criticized the arrest as illegal, citing violation of rights. The victim's family expressed outrage, alleging corruption and planning to appeal.
Web Summary : पति की हत्या की आरोपी सोनम रघुवंशी को पुलिस द्वारा एक गैर-मौजूद कानूनी धारा का उल्लेख करने के कारण जमानत मिली। अदालत ने गिरफ्तारी को अवैध बताते हुए अधिकारों का उल्लंघन बताया। पीड़ित परिवार ने आक्रोश व्यक्त करते हुए भ्रष्टाचार का आरोप लगाया और अपील करने की योजना बनाई।