Join us
Daily Top 2Weekly Top 5

३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:02 IST

२५ एप्रिल रोजी रात्री ११.१० च्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत 'एक्स' हँडलवर एका युजरने हा व्हिडीओ टॅग करून तक्रार केली होती.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे एक भयानक उदाहरण मुंबईतील गोरेगावमध्ये पाहायला मिळाले. आपल्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त एका ३३ वर्षीय तरुणाने चक्क राम मंदिर रोडवर पेट्रोलने '३३' हा आकडा लिहिला आणि त्यावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला.

फहाद खलील समशुद्दीन शेख (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो व्यवसायाने कार डीलर आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फहाद आधी सिगरेट पेटवताना दिसतो आणि त्यानंतर त्याच काडीने रस्त्यावरील पेट्रोलच्या ट्रेलला आग लावतो. क्षणार्धात रस्त्यावर आगीचे लोट उसळतात. धक्कादायक म्हणजे, आग तशीच सोडून तो आपल्या कारमध्ये बसून आरामात निघून जातो.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 

आरोपीवर पोलिसांनी केली कारवाई

२५ एप्रिल रोजी रात्री ११.१० च्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत 'एक्स' हँडलवर एका युजरने हा व्हिडीओ टॅग करून तक्रार केली होती. याची दखल घेत गोरेगाव पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८७ आणि १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या रस्त्यावर अशा प्रकारे ज्वलनशील पदार्थाचा वापर करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai man's dangerous birthday stunt: Sets road ablaze for reel.

Web Summary : A 33-year-old car dealer in Goregaon, Mumbai, was arrested for setting a road on fire to celebrate his birthday and create a social media reel. He poured petrol in the shape of '33' and ignited it. Police took swift action after the video went viral.
टॅग्स :मुंबईसोशल व्हायरल