मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:40 IST2025-07-16T17:40:25+5:302025-07-16T17:40:54+5:30

जमीन नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली

Shivne Mandal officer in Maval taluka caught red-handed while accepting a bribe of Rs 2 lakhs | मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पवनानगर: मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला आणि त्याच्या एका साथीदाराला दोन लाख १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाईन रोडवर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. मारुती महादेव चोरमले (५३) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती जयेश बाळासाहेब बारमुख (३३, चांदखेड, मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे. 

एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये बांधकाम व्यावसायिक पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांना १ कोटी ९० लाख रुपये देऊन त्यांच्याकडून कुसगाव मावळ येथील ३८ गुंठे जमीन विकसन करारनामा करून घेतला आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक स्वाईन यांनी तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्या जागेचे खरेदीखत झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज केला. तलाठ्याने त्या व्यक्तीचा फेरफार नोंद करून तो मंजुरीसाठी मंडल अधिकारी मारुती चोरमले याच्याकडे पाठवला.

संबंधित फेरफार मंजूर न होण्यासाठी तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी हरकत घेतली. त्याप्रमाणे मंडल अधिकारी चोरमले याने हरकत अर्जावर सुनावणी सुरु केली. दरम्यान, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांनी तक्रारदार यांना या प्रकरणाचे अधिकारपत्र दिले. त्यानुसार तक्रारदार हरकतीच्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहत होते. नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ३८ गुंठे वादग्रस्त जमीन तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ जणांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली. तसेच त्याचा सहकारी जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. जयेश बारमुख याने मंडल अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपये आणि स्वतःसाठी दहा हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने १४ आणि १५ जुलै रोजी सापळा लावला. १५ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी मधील स्पाईन रोड येथे एका रुग्णालयाच्या समोर आरोपींनी तक्रारदार यांना बोलावले. तिथे मंडल अधिकारी चोरमले याने दोन लाख रुपये रोख स्वरूपात तर जयेश बारमुख याने १० हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून लाच घेतली. लाच घेत असताना एसीबीने दोघांना रंगेहाथ  पकडले.

Web Title: Shivne Mandal officer in Maval taluka caught red-handed while accepting a bribe of Rs 2 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.