शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

By राजू इनामदार | Updated: February 26, 2025 16:06 IST2025-02-26T16:02:23+5:302025-02-26T16:06:11+5:30

पक्षप्रवेशांचे जाहीर आमंत्रण; राजकीय बळकटी येणार असल्याचा दावा

Shinde Sena Tiger Mission Nationalist involvement in Shinde Sena Tiger Mission Public invitation to join the party | शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

पुणे : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सध्या पुण्यात  मिशन टायगर सुरू आहे. त्यात अन्य पक्षातील काहीजणांचे पक्षप्रवेश करून घेण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा तिथे प्रवेश होणार अशी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या राज्य पदाधिकारी रूपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर व धंगेकर यांच्याच जाहीर वाद झाले असतानाही हे आमंत्रण दिले गेले हे उल्लेखनीय आहे.

रूपाली पाटील म्हणाल्या की धंगेकर हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. माजी नगरसेवक म्हणून त्यांच्याबरोबर शिवसेनेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करताना त्यांच्या जनमाणसातील लोकप्रियतेचा व त्यांच्या कामाच्या पद्धतीचाही अनुभव आला आहे. तळातील माणसांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे अशी व्यक्ती पक्षात आली तर पक्षाला बळकटी मिळेल असे वाटते. त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन आहे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढावा असे वाटते. त्यामुळे शिंदेसेना काय करते आहे याच्याबाबत आपल्याला काहीच बोलायचे नाही, मात्र धंगेकर कुठे चाललेच असतील तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष योग्य असल्याचे वाटत असल्याने त्यांना आमंत्रण देत आहे.

दुसरीकडे धंगेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यात विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीर वादविवाद झाले होते. काँघ्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या घंंगेकरांवर मानकर यांनी जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला धंगेकर यांनीही पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर देत, मलाही तुमच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढायला लागतील असा इशारा दिला होता. त्याचबरोबर मानकर यांच्यावर झालेल्या पोलिसी कारवाईचाही त्यांनी जाहीर उल्लेख केला होता. मानकर यांनी धंगेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या आमंत्रणाबद्दल बोलताना सांगितले की असे कोणीही कोणाला बोलवू शकते, मात्र आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत. ते काय घेतील तोच अंतीम निर्णय असतो. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशाबाबतही तेच निर्णय घेतील व तो आम्हाला मान्य असेल.

खुद्द धंगेकर यांनी मात्र आपल्या पक्ष सोडण्याबद्दलच्या सर्व वृत्तांचा इन्कार केला आहे. काँग्रेसपक्ष जुना, मोठा, राष्ट्रीय पक्ष आहे. तिथे मतभेद असणारच, पण म्हणून पक्ष सोडायचा असतो असे नाही असे त्यांनी म्हटले आहे. धंगेकर यांची राजकीय सुरूवात शिवसेनेपासून झाली. त्यानंतर ते मनसेत गेले. तिथून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणुकही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुण्यातून लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. आता गेले अनेक महिने त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

Web Title: Shinde Sena Tiger Mission Nationalist involvement in Shinde Sena Tiger Mission Public invitation to join the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.