शितल तेजवाणींचे विदेशात पलायन? पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:00 IST2025-11-08T19:59:53+5:302025-11-08T20:00:55+5:30
कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन खरेदीखत करताना, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शितल तेजवाणी यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

शितल तेजवाणींचे विदेशात पलायन? पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही
पुणे: मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शितल किसनचंद तेजवाणी यांनी विदेशात पलायन केल्याची चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तेजवाणी यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. नुकताच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन्ही जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी सहभागी आहे.
पोलिसांकडील माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन खरेदीखत करताना, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शितल तेजवाणी, अमेडिया एंटरप्रायजेसचे संचालक दिग्विजय पाटील, सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच कृषी खात्याकडे बोपोडीतील पाच हेक्टर जमिनीचा ताबा असताना तहसीलदारांना हाताशी धरून जमिनीचा अपहार करून बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तहसीलदार सूर्यकांत येवले, अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील, शितल तेजवाणी यांच्यासह खडक पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यात तेजवाणी संशयित आरोपी असून, त्यांनी भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जाते. अशातच आता तेजवाणी फरार असल्याची चर्चा रंगत असल्याने पोलिस तपासात पुढे काय निष्पन्न होते, हे महत्त्वाचे आहे.