मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अखेर अटक
By किरण शिंदे | Updated: December 3, 2025 16:39 IST2025-12-03T16:38:50+5:302025-12-03T16:39:20+5:30
चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.

मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अखेर अटक
पुणे - मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
अधिकच्या माहितीनुसार, शितल तेजवानीला अटक करण्याची कारणे समोर आली आहे. तेजवानीने शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केली. शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक करण्यात आली तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला होता. शीतल तेजवानी विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. याबाबत तेजवानी यांची चौकशी करून त्यांना खुलासा पोलिसांनी मागितला होता.
दरम्यान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शितल किसनचंद तेजवाणी विदेशात पलायन केल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज पुणे पोलिसांकडून तेजवाणीला अटक केल्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. तेजवाणी यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहे. तसेच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी सहभागी आहे.
कोण आहे शीतल तेजवानी?
शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे दांपत्य सेवा विकास बँकेतील तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. सागर सूर्यवंशी (पूर्वी तेजवानी) यांनी पत्नी शीतल तेजवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण ४१ कोटी रुपयांची १० कर्जे घेतली. या सर्व कर्जांसाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. ही कर्जे सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखांमधून उचलण्यात आली.
आयटी पार्क उभारण्याच्या नावावर मिळवली सवलत
पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुल मुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्याकडून मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ४० एकर जमिनीची खरेदी ३०० कोटी रुपयांमध्ये केली. आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगून उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेण्यात आले. त्यामुळे मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. दस्त खरेदीसाठी सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यातील पाच टक्के शुल्काला यातून सवलत मिळते. दस्त खरेदी करताना संपूर्ण सात टक्के अर्थात २१ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. सहजिल्हा निबंधकांच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी वसुलीची नोटीस बजावली होती.