खारगे समितीच्या सुनावनीला शीतल तेजवानी गैरहजर तर दिग्विजयसिंह पाटील हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:20 IST2025-11-20T13:20:11+5:302025-11-20T13:20:24+5:30
अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी तेजवानी गैरहजर राहिल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे

खारगे समितीच्या सुनावनीला शीतल तेजवानी गैरहजर तर दिग्विजयसिंह पाटील हजर
पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या खारके समितीसमोर बुधवारी मुंबईत सुनावणी झाली. त्यात या प्रकरणातील कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी गैरहजर राहिल्या, तर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील उपस्थित राहिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी तेजवानी गैरहजर राहिल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.
मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीची आणि सध्या त्यांच्या ताब्यात असलेली ४० एकर जमीन तीनशे कोटी रुपयांत पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीला विकण्यात आल्याचे उघड झाले. या व्यवहारात कंपनीचे दिग्विजयसिंह पाटील आणि कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात हा व्यवहार झाला. या व्यवहाराची दस्तनोंदणी करताना अनेक नियमांना बगल देण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त महसूल सचिव खारगे यांची समिती नेमली आहे. या समितीने बुधवारी सुनावणीसाठी हजर राहण्याचे अमेडिया कंपनी आणि तेजवानी यांना समन्स बजावले होते.
प्रत्यक्षात बुधवारी समितीपुढे सुनावणीसाठी केवळ कंपनीचे प्रतिनिधी पाटील उपस्थित राहिल्याचे समजते. मात्र, तेजवानी या गैरहजर राहिल्या. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी समितीच्या वतीने तेजवानी यांना २४ तारखेला उपस्थित राहण्याचे पुन्हा समन्स बजाविण्यात आले असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.