सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:58 AM2021-01-22T00:58:21+5:302021-01-22T06:53:35+5:30

इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले.

Serum Institute fire, five dead; suspicion of fire due to welding | सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय

सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय

Next

पुणे : कोरोनावरील लस बनवून जगाला दिलासा देणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २१) दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी इन्स्टिट्यूटमधील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर लागलेली ही आग सायंकाळी साडेपाच वाजता आटोक्यात आली. कोरोनावरील कोविशिल्ड या लस उत्पादनाला आगीपासून कोणताही धोका पोहोचलेला नाही.

इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर दोन्ही मजल्यांवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी होरपळलेल्या ५ व्यक्ती आढळल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोरोना लस उत्पादन सुरक्षित -
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन जोरात सुरू आहे. येथून देशात आणि देशाबाहेर दररोज लक्षावधी लसी जात आहेत. त्यामुळे ‘सीरम’मधील आगीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. केंद्रीय गृहमंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही या घटनेची तातडीने चौकशी करण्यात आली. मात्र, कोरोना लस उत्पादनाला आगीची कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एकापाठोपाठ ३ स्फोटांनी हादरला परिसर -
आग लागली असतानाच दुपारी ३ वाजता पहिला स्फोट झाला. दुसरा स्फोट ३ वाजून २५ मिनिटांनी झाला. पाठोपाठ तिसरा स्फोट झाल्याचा आवाज आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या इमारतीत कोणतेही उत्पादन सुरू नव्हते. आग प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून वाचवला जीव -
- मांजरी गावाजवळच्या एसईझेडमध्ये सीरम इन्स्टिट्यूटचा प्रकल्प आहे. तेथे काम सुरू असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. काही कामगार इमारतीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. 

- काही जणांनी तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उड्या मारून जीव वाचविला. या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बीसीजी लसीचे उत्पादन घेण्यात येणार होते.

मुख्यमंत्री करणार पाहणी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.

Web Title: Serum Institute fire, five dead; suspicion of fire due to welding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.