धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका सहकारी बँकेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून त्यावर लाखो रुपयांचे कर्ज लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेचे अधिकृत सुवर्ण मूल्यमापनकार आणि दोन कर्जदारांनी संगनमताने बँकेची तब्बल ७ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी लक्ष्मण उमाजी पाटील (सुवर्ण मूल्यमापनकार, रा. आंबेगाव पठार ), गणेश बाबासाहेब आदलिंग (कर्जदार, रा. किरकटवाडी) व शशिकांत संभाजी गोदगे (कर्जदार, रा. आंबेगाव पठार) या तिघांविरोधात नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँकेच्या वतीने मेघनाथ सदाशिव बोडस (वय ६३) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फसवणुकीचे प्रकरण प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लि. धायरी शाखा येथे घडले. दि. २८ मार्च २०२५ ते दि. २५ जून २०२५ या कालावधीत हा सर्व गैरप्रकार सुरू होता. बँकेचे नियुक्त मूल्यमापनकार लक्ष्मण उमाजी पाटील यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत कर्जदारांशी हातमिळवणी केली. दि. २८ मार्च २०२५ रोजी कर्जदार शशिकांत संभाजी गोदगे याने बँकेत सोने तारण ठेवले. व्हॅल्युअर लक्ष्मण पाटील यांनी ७६ ग्रॅम ७६० मिली वजनाचे बनावट सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यावर बँकेने ३,४४,००० रुपयांचे कर्ज मंजूर केले. दि. १८ जून २०२५ रोजी कर्जदार गणेश बाबासाहेब आदलिंग याने ८० ग्रॅम ५०० मिली बनावट सोने तारण ठेवले. पुन्हा व्हॅल्युअरने हे सोने खरे असल्याचे सांगून ४,००,००० रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले. अशा प्रकारे एकूण १५७ ग्रॅम २६० मिली बनावट सोने बँकेकडे तारण ठेवून एकूण ७,४४,००० रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. आरोपींनी कर्जाची परतफेड न करता बँकेचा विश्वासघात केला. त्यावरून नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक डी. डी. सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Summary : Two individuals in Pune defrauded a cooperative bank by using fake gold as collateral, securing ₹7.44 lakh in loans. The bank's evaluator colluded in the scam, leading to a police investigation and charges against three people.
Web Summary : पुणे में दो लोगों ने नकली सोना गिरवी रखकर एक सहकारी बैंक को ₹7.44 लाख का चूना लगाया। बैंक के मूल्यांकनकर्ता ने घोटाले में मिलीभगत की, जिससे पुलिस जांच हुई और तीन लोगों पर आरोप लगे।