खळबळजनक प्रकार! पुण्यात वयचोरी करून बोगस क्रिकेटपटू सर्रास मैदानावर, १७ खेळाडूंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:46 IST2025-01-09T10:46:14+5:302025-01-09T10:46:27+5:30
अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, क्रिकेट संघटकांची मागणी

खळबळजनक प्रकार! पुण्यात वयचोरी करून बोगस क्रिकेटपटू सर्रास मैदानावर, १७ खेळाडूंचा सहभाग
उमेश जाधव
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ वर्षांखालील पात्रता क्रिकेट सामन्यात खेळलेल्या खेळाडूच्या वयावर प्रतिस्पर्धी संघाने आक्षेप घेतल्यानंतर संबंधित खेळाडूने नियमांना बगल देत ‘क्रिकेटहिरो’ या ॲपवरील प्रोफाइल हटवले. त्यानंतर आणखी तीन खेळाडूंनी प्रोफाइल हटवल्यामुळे पुण्यात वयचोरी करून सर्रास मैदानावर खेळणारे अनेक क्रिकेटपटू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत १७ खेळाडूंनी वयचोरी केल्याची माहिती आयोजक पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेकडून देण्यात आली आहे.
६ आणि ७ जानेवारीला श्री साई युवा क्रिकेट अकॅडमी विरुद्ध पीआयओसी सामना खेळवण्यात आला. त्यातील श्री साई युवा क्रिकेट अकॅडमीच्या ओंकार झिपुरडे, प्रज्वल के, डी. के. आणि रजत काळे यांनी प्रोफाइल हटवले. त्यानंतर ओंकार दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिला. या संशयास्पद प्रकारानंतर पीआयओसीचे संचालक राजेश धुमाळ यांनी पीडीसीएमध्ये तक्रार केली.
राजेश धुमाळ म्हणाले की, सहा जानेवारीला सामना सुरू झाला तेव्हा दाढी केलेले खेळाडू कळून येतात. शरीरयष्टीमुळेही अधिक वयाचे खेळाडू सहज ओळखता येतात. १६ वर्षांखालील खेळाडूंमध्ये परिपक्वतेचा अभाव असतो. त्यामुळे आम्ही चार मुलांवर आक्षेप घेतला होता. ओंकार हा १९ वर्षांखालील गटातही खेळला असून खुल्या गटातही खेळला आहे. त्यामुळे आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी पीडीसीएमध्ये लेखी तक्रार देण्यास सांगितले त्यानुसार आम्ही तक्रार केली आहे.
साई युवा क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक अर्जुन शिंदे म्हणाले की, वयचोरी करून मैदानावर खेळणाऱ्यांना माझाही विरोधच आहे. पण पालक कोणती कागदपत्रे सादर करतात हे आम्हाला ठाऊक नसते. आम्ही पालकांवर विश्वास ठेवून खेळाडूंना संधी देतो. पालक आणि खेळाडू यांनी कोणतीही खोटी कागदपत्रे न देता खरे वय सांगून संधी मिळवावी. आमच्या संघात अधिक वयाची मुले आढळली तर पीडीसीए, एमसीएची समिती जी कारवाई करेल ती आम्हाला मान्य असेल.
कठोर कारवाई करणार!
वयचोरी करून खेळाडू खेळत असतील तर त्यांना सर्व वयोगटात खेळण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. याआधी दोन-तीन वर्षे बंदी घालण्याचा विचार होता पण खेळाडूंना त्याची भीती राहिलेली नाही त्यामुळे आम्ही आणखी कठोर होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. लवकरच वयचोरी ९० टक्के कमी होईल अशी आशा आहे. या गैरप्रकाराची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल. - सुशील शेवाळे, सचिव पुणे जिल्हा क्रिकेट संघटना
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत!
पीडीसीएकडे या सामन्यांचे नियोजन असते तेव्हा सातत्याने असे प्रकार होत आले आहेत. अशा प्रकारांना खेळाडू जबाबदार आहेतच. परंतु जे संघ आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामध्ये पीडीसीएच्या पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध असू शकतात असा संशय आहे. त्यामुळे नियमित असे गैरप्रकार घडत आहेत. श्री साई युवा क्रिकेट क्लबचा मागेही असा प्रकार उघडकीस आला होता पण कारवाई झाली नाही. आता या प्रकारातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले तर अशा प्रकारांना आळा बसेल. - दत्ता वाळके, क्रीडा संघटक