भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:54 IST2025-02-15T16:52:34+5:302025-02-15T16:54:17+5:30
अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार
पुणे: भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुधाकर दादाराव झांबरे (८०, रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार रमेश सदाशिव वाडकर (रा. हांडेवाडी रस्ता हडपसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत झांबरे यांच्या पत्नी शांता झांबरे (७०) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर झांबरे हे १६ नोव्हेंबर रोजी हडपसर भागातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने पादचारी झांबरे यांना पाठीमागून धडक दिली. अपघातात झांबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुचाकीस्वार वाडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.