पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:21 IST2025-05-08T11:21:09+5:302025-05-08T11:21:49+5:30
सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि वल्लभनगर या आगारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि हायमास्ट दिव्यांची संख्या जास्त असणार

पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे
पुणे: स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेनंतर पुणे एसटी विभागातील सर्व स्थानकांत सुरक्षा यंत्रणा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ३०० सीसीटीव्ही कॅमेरे, २६२ पुरुष आणि महिला सुरक्षारक्षक, हायमास्ट दिवे आणि बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि वल्लभनगर या आगारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि हायमास्ट दिव्यांची संख्या जास्त असणार आहे.
स्वारगेट प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील १४ आगारांतर्गत येणाऱ्या ४२ स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. यामध्ये सर्व स्थानकांवर सुरक्षारक्षक, सुरक्षा भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था या गोष्टींची कमतरता आढळून आली होती. यातून धडा घेत भविष्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाेस उपाययाेजना करण्यासाठी एसटी प्रशासनाकडून वरिष्ठांकडे सुरक्षा मजबूत करण्यासाठी तपशिलासह एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात आला होता. पुणे विभागात ही घटना घडल्यामुळे त्यांनी तातडीने पुणे विभागातील १४ आगारांतर्गत येणाऱ्या ४२ बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. त्यांनतर सुरक्षेच्या दृष्टीने कमतरता असणाऱ्या गोष्टींवर भर देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि हायमास्ट दिवे आणि सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे.
चार गोष्टींना प्राधान्य
बलात्कार प्रकरणानंतर करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये चार गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. यामध्ये पुणे विभागातील प्रत्येक बसस्थानकात प्रामुख्याने प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, सुरक्षा भिंत आहे का? या चार गोष्टी तपासण्यात आल्या. परंतु, बहुतांश स्थानकावर या गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षा ऑडिटमध्ये या सर्व गोष्टी तेथे असाव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
प्रत्येक स्थानकात महिला सुरक्षारक्षक
एसटीत प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यासाठी बसस्थानकात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, यासाठी सर्व बसस्थानकांत महिला सुरक्षा नेमण्यात येणार आहे. शिवाय या सुरक्षारक्षक दोन शिफ्टमध्ये कामावर असणार आहेत. तसेच ज्या बसस्थानकात सीमा भिंत नाही, त्याठिकाणी सीमा भिंत बांधण्यात येणार आहे.
पुणे विभागातील सर्व बसस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे आणि बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे. शिवाय दोन शिफ्टमध्ये महिला सुरक्षारक्षक ड्यूटीवर नेमण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध आहे. -अरुण सिया, विभाग
पुणे विभागातील आकडेवारी
एकूण आगार - १४
एकूण बस - ७५०
दैनंदिन प्रवासी संख्या - १ लाख २० हजार
दैनंदिन उत्पन्न - १ कोटी ५० लाख
पुण्यातून बाहेर जाणाऱ्या बस - ९००
बाहेरून पुण्यात येणाऱ्या बस - ११००