यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा तत्कालीन चेअरमनकडून घोटाळा - मेधा कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:54 IST2025-05-16T17:53:50+5:302025-05-16T17:54:25+5:30
अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवून सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे

यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा तत्कालीन चेअरमनकडून घोटाळा - मेधा कुलकर्णी
पुणे : फलटण ( जि. सातारा) येथील यशवंत कॉ ऑप. बँकेत ठेवीदारांच्या ठेवींचे पैसे लाटून बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांनी जवळपास १५० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांनी अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवून सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केल्याचा आरोप राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पत्रकार परिषदेत केला.
बँकेमधील ठेवीदारांच्या पैशाचा विनियोग स्वतःच्या खासगी मालमत्तेसाठी करून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच चरेगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह निलेश जाधव, गणेश पवार, एस डी कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, यशवंत सहकार बँकेमध्ये ठेवीदारांनी २५ वर्षांपासून ठेवी ठेवल्या आहेत. मात्र त्यातील पैसे त्यांना काढता येत नाही. अनेक ठेवीदारांवर दबाव टाकला जात आहे. अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढण्यात आली असून, यात १५० कोटींपैकी १२७ कोटी रुपयांची कर्जे ही केवळ शेखर चरेगावकर यांच्या आणि नातेवाईकांच्या नावाने आहेत . स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ती कर्ज बुडीत दाखवून आरबीआयकडून केवळ पाच लाख रुपये ठेवीदारांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासनाची फसवणूक करण्यात येत आहे. कोणताही कागदपत्राची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला असल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.