‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, पुण्यात मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट, १००० मुलांमागे ९११ मुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:46 IST2025-10-03T11:45:48+5:302025-10-03T11:46:01+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, मुलींच्या जन्मदराबाबत कठोर कायदा अंमलबजावणीबरोबरच जनजागृती मोहिमाही जोरदार राबवणे आवश्यक आहे

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, पुण्यात मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट, १००० मुलांमागे ९११ मुली
पुणे: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या मोहिमा राबवूनही पुरोगामी पुण्यात मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट झाल्याचे समोर आले आहे. शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये दर हजार मुलांमागे केवळ ९११ मुली जन्माला आल्या आहेत. दर हजार मुलांमागे किमान ९५० मुलींचा जन्मदर हा सामाजिक समतोल राखण्यासाठी आवश्यक मानला जातो. मात्र पुण्यात गेल्या काही वर्षांपासून हा दर गाठलेला नाही.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. त्यानुसार २०२० मध्ये दर हजार मुलांमागे ९४६ मुली जन्मल्या होत्या. हा दर गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक होता. मात्र त्यानंतर दरवर्षी घट होऊन २०२१ मध्ये ९१०, २०२२ मध्ये ९१०, २०२३ मध्ये ९०६ तर २०२४ मध्ये किंचित सुधारणा होऊन ९११ एवढाच दर नोंदवला गेला.
सन २०११ मध्ये हा दर सर्वात कमी म्हणजे ८८८ इतका नोंदवला गेला होता. त्यामुळे शहरात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी योग्यरीतीने होत आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, मुलींच्या जन्मदरातील घट ही चिंताजनक असून यासाठी कठोर कायदा अंमलबजावणीबरोबरच जनजागृती मोहिमाही जोरदार राबवणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक संतुलन बिघडण्याची भीती आहे. सांस्कृतिक आणि पुरोगामी ओळख असलेल्या पुण्यात मुलींचा जन्मदर घसरत चालल्याने समाजाच्या आरोग्याला धोक्याची घंटा वाजली आहे.
वर्ष- मुलांची संख्या- मुलींची संख्या- हजार मुलांमागे मुलांची संख्या
२०२०- २५९६७- २४५७७- ९४६
२०२१- २६२५०- २३९०३- ९१०
२०२२- २५६३०- २३३२१- ९१०
२०२३- २५१३५- २२९२८- ९०६
२०२४- २३४८०- २१३८४- ९११