Satish Wagh Case : सतीश वाघ खूनप्रकरणी बायकोच मास्टरमाइंड; मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध अन् असा रचला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:57 IST2024-12-26T13:47:28+5:302024-12-26T13:57:23+5:30

सतीश वाघ बघणारे सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्या हातात पाहिजे होते. सतीश तिला खर्चासाठी पैसेदेखील देत नव्हता.

Satish Wagh Case Wife is the mastermind in Satish Wagh murder case; Love affair with son's friend and this is how the plot was hatched | Satish Wagh Case : सतीश वाघ खूनप्रकरणी बायकोच मास्टरमाइंड; मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध अन् असा रचला डाव

Satish Wagh Case : सतीश वाघ खूनप्रकरणी बायकोच मास्टरमाइंड; मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध अन् असा रचला डाव

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या खुनाचा कट मामीने घरातच रचल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधासह नवऱ्याचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच ताब्यात असावा, या उद्देशाने ५ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेतील मास्टरमाइंड बायकोच असून, तिने प्रियकराच्या मदतीने मारेकऱ्यांना ५ लाख रुपये देऊन पतीचा खून घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मोहिनी सतीश वाघ (४८, रा. ब्लूबेरी हॉटेलजवळ, फुरसुंगी फाटा, फुरसुंगी), असे अटक पत्नीचे नाव आहे. सतीश तात्याबा वाघ (५८, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता), असे खून केलेल्याचे नाव असून, पोलिसांनी यापूर्वीच तिचा प्रियकर अक्षय हरीश जावळकर, पवन श्यामकुमार शर्मा (३०, रा. शांतीनगर, धुळे), विकास शिंदे, नवनाथ अर्जुन गुरसाळे (३२, रा. अनुसया पार्क, वाघोली) आणि आतिश जाधव या आरोपींना अटक केली आहे.


 

आरोपी अक्षय हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू होता. त्यावेळी मोहिनी सोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकुण सतीशला लागली होती. त्यामुळे मोहिनीने नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव रचला. तिने अक्षयला नवरा सतीशचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीशला मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला कटात सहभागी करून घेतले.

याबदल्यात अक्षयने आरोपीला आगाऊ दीड लाख रुपये दिले. त्यानंतर सतीश वाघ हे ९ डिसेंबर रोजी पहाटे मॉर्निंग वॉक करत असताना, पाच जणांनी त्यांचे अपहरण करून सासवडच्या दिशेने नेले. अवघ्या १५ मिनिटांमध्ये मारेकऱ्यांनी गाडीतच वाघ यांच्यावर ७२ वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून दिला. गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना अटक केली. 

मोहिनीला आर्थिक व्यवहार पाहिजे होते हातात..

सतीश वाघ बघणारे सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्या हातात पाहिजे होते. सतीश तिला खर्चासाठी पैसेदेखील देत नव्हता. यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडले पाहिजे, असे काहीतरी कर, असे सांगितले होते. तसेच मोहिनीने अक्षयला तू जर असे केले नाहीस तर आपले लफडे मी माझ्या नवऱ्याला सांगिन, मग तो तुझी काय हालत करेल हे बघ, अशी धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अक्षय दबावाखाली होता. ही बाब त्याने पवनला सांगितली. त्यानंतर आरोपींनी संगनमताने सतीश वाघ यांचे अपहरण करत खून केला. आरोपी अक्षय याने पोलिस तपासात मोहिनीनेच खुनाची सुपारी दिल्याचे सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिची चौकशी करत, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवली. मोहिनीचा या कटातील सहभाग स्पष्ट होताच बुधवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली. 

Web Title: Satish Wagh Case Wife is the mastermind in Satish Wagh murder case; Love affair with son's friend and this is how the plot was hatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.