Pune Crime: यवतच्या संत तुकाराम महाराज पालखी तळात एकाचा निर्घृन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:36 IST2022-07-27T18:36:50+5:302022-07-27T18:36:59+5:30
मंदिराच्या समोरच असलेल्या पालखी तळात रात्री उशिरा एकाचा खून झाल्याने सकाळी मोठी खळबळ उडाली.

Pune Crime: यवतच्या संत तुकाराम महाराज पालखी तळात एकाचा निर्घृन खून
यवत : यवत येथे संत तुकाराम महाराज पालखी तळाच्या सभागृहात एका ४७ वर्षीय पुरुषाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घुण खून करण्यात आला आहे. संजय सखाराम बनकर ( वय - ४६, रा.सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज (दि.२७ ) रोजी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या पालखी तळात रात्री उशिरा एकाचा खून झाल्याने सकाळी मोठी खळबळ उडाली.
बनकर यांची पत्नी मनीषा हिचे माहेर खामगाव , तांबेवाडी (ता. दौंड) येथिल असून ती मागील काही वर्षांपासून माहेरी राहत होती. संजय बनकर सोलापूर येथे त्यांच्या आईकडे राहत होता. मात्र अधून मधून तो त्याच्या पत्नीकडे येत असे. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी तो सोलापूर येथून आला होता. आज सकाळी यवत येथील पालखी तळात एका व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे व पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या पोटात धारदार शस्त्राने तीन ते चार वार केल्याचेही आढळून आले. त्याच्याकडे मिळालेल्या मोबाईल वरून त्याची ओळख पटवण्यास मदत झाली. खून झालेल्या व्यक्तीचा मोबाईल व इतर पुराव्यांवरून मारेकऱ्यांचा तपास यवत पोलिसांनी सुरु केला. मध्यरात्री १२ ते ४ दरम्यान खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
यवत येथील महालक्ष्मी मातेची आखाड यात्रा प्रचंड मोठी आणि प्रसिद्ध असून मुंबई, पुणे सह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात. आषाढी एकादशी झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी येथे मोठी यात्रा भरते. काल रात्रीच्या वेळी गर्दी असताना मंदिरासमोरील बाजार मैदानात पालखी तळ मध्ये खून झाल्याने खळबळ उडाली आहे.