पक्षप्रवेश कधी, कुठे होणार ? संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 12:00 IST2025-07-13T11:59:45+5:302025-07-13T12:00:09+5:30

- वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.यामुळे त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात

Sanjay Jagtap resigns as Congress district president | पक्षप्रवेश कधी, कुठे होणार ? संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

पक्षप्रवेश कधी, कुठे होणार ? संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

सासवड :पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शनिवारी (दि.१२) आपल्या पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. दरम्यान, उद्या (दि.१४) सासवड येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे नीरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षावर माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबीयांची मोठी पकड आहे. दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्येच गेली. त्यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही यश मिळविता आले नाही. मात्र तरीही काँग्रेसवरील त्यांनी निष्ठा संपूर्ण हयातभर ठेवली होती. विविध राजकीय पक्षांनी त्यांना पद्धतशीरपणे बगल देण्याचे काम केले. संजय जगताप यांचीही तालुक्यावर चांगली पकड होती. आमदार असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामेही केली.

दरम्यानच्या काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळे संजय जगताप हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी साफ नकार दिला होता. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. अन संजय जगताप यांचा धक्कादायक पराभव झाला. दरम्यानच्या काळात भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपची वाट धरली. त्याचबरोबर पुन्हा एकदा संजय जगताप हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. यावेळी मात्र, या चर्चेला दुजोरा मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती. गावोगावी बैठका घेत कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या. अखेर शनिवारी (दि.१२) संजय जगताप यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे पाठवला असून, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडेही राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे.

भाजपप्रवेश सासवडला की मुंबईला

भाजपच्या गोटात दाखल झालेल्या नेत्यांनी पहिल्यांदा मुंबईत पक्षप्रवेश करून त्यानंतर मतदार संघात मेळावे घेतले. मात्र, संजय जगताप यांचा पक्षप्रवेश सासवडमध्ये १६ जुलैला करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अजून वेळ दिली नसल्याचे समजते. त्यामुळे हा पक्षप्रवेश मुंबईत होणार की सासवडमध्ये याबाबत संभ्रमता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजेश पांडे हे पक्ष प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत.
 
काँग्रेसवर परिणाम

पुरंदर काँग्रेसवर जगताप परिवाराची मोठी पकड असून,जिल्हा बँकेचे संचालकपद, बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटातील सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य, सासवड व जेजुरी नगरपरिषदेवर अनेक वर्षे एकहाती सत्ता असून सहकार, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात त्यांची मोठी पकड असल्याने अनेक गावच्या विकास सोसायट्या, ग्रामपंचायती. दूधसंघ, नीरा बाजार समिती, खरेदीविक्री संघ यावर त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे जगताप यांच्यासोबतच संपूर्ण पक्षच भाजपला मिळणार आहे. याचा थेट परिणाम काँग्रेसवर होणार असून तालुक्यातील काँग्रेस पक्षच निराधार होण्याची भीती आहे.
 

विजय शिवतारेंसमोर आव्हान उभे राहणार

येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका येत असून, संजय जगताप यांच्या माध्यमातून अनेक वर्षे पुरंदर तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला त्याचा फायदा होणार आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जगताप यांच्या मदतीने भाजपला प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महायुतीमधील शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्या समोर भाजपचे अंतर्गत आव्हान उभे राहणार असून संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय संघर्षाचा दुसरा अंक लवकरच पाहायला मिळणार हे नक्की.

Web Title: Sanjay Jagtap resigns as Congress district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.