नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:10 IST2025-02-11T20:10:02+5:302025-02-11T20:10:26+5:30
साहिलने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच २०२३ मध्ये केरळ येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान
पुणे: जिमनॅस्टिक मधील उल्लेखनीय कामगिरी बद्दल २ वेळा नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट म्हणून नावलौकिक मिळवलेल्या धनकवडी येथील साहिल मरगजेचा अँटी करप्शन ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐश्वर्य व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पर्वात ‘कर हर मैदान फतेह’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नृत्यांगना स्वप्ना कुंभार, खेळाडू आलोक मनोज तोडकर आणि सायंटिस्ट आदेश फलफले यांना देखील गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे व मित्र परिवार उपस्थित होते.
साहिलचे प्राथमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल मध्ये झाले असून आता तो द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. साहिल मागील दहा वर्षांपासून जिमनॅस्टिकचा सराव करत आहे. यापूर्वी साहिल ने २०१९ मध्ये दिल्ली येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच २०२३ मध्ये केरळ येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट म्हणून नावलौकिक मिळविला आहे. सध्या तो बिबवेवाडी येथील एस के जिमनॅस्टिक्स मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सौरभ कोकाटे यांच्या मार्गदर्शना खाली जिमनॅस्टिकचे प्रशिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.