कात्रजच्या नवीन बोगद्यापासून अर्धा किमीवर ‘रम्बल स्ट्रिप’; अपघातांना आळा बसेल, पुणे महापालिकेचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:20 IST2025-11-15T13:15:09+5:302025-11-15T13:20:59+5:30
नवले पुलाजवळ असलेल्या तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे बहुतांश अपघात होत असल्याचे समोर आले आहे

कात्रजच्या नवीन बोगद्यापासून अर्धा किमीवर ‘रम्बल स्ट्रिप’; अपघातांना आळा बसेल, पुणे महापालिकेचा विश्वास
पुणे: नवले पूल परिसरात होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून कात्रजच्या नवीन बोगद्यापासून नवले पूलापर्यंत दर अर्धा किलोमीटर अंतरावर तब्बल पाचशे मीटर ‘रम्बल स्ट्रिप’ बसविण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.
नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ नागरिकांचा जीव गेला, तर वीसपेक्षा अधिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस अधिकारी यांची शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवले पुलाजवळ असलेल्या तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे बहुतांश अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाचशे मीटर अंतरावर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी रम्बल स्ट्रिप बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. तसेच, नवीन कात्रजचा बोगदा ते हिंजवडीदरम्यान पुणे-बंगळुरू रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी चार सेवा रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. हे सेवा रस्ते सुरू झाल्यानंतर महामार्गावर होणारी वाहतूककोंडी कमी होणार आहे. दुचाकीचालक, तसेच जवळच्या भागात राहणारे वाहनचालक सेवा रस्त्यांचा वापर करण्यावर भर देतील, परिणामी वाहतूककोंडी सुटणार आहे. बालेवाडी ते कात्रज दरम्यान असलेले सेवा रस्ते तयार होणे आवश्यक आहे. यासाठी काही जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी संबधित जागा मालकांना टीडीआर, एफएसआय तसेच रोख मोबदला देण्याबाबत देखील अभ्यास सुरू आहे. चार सेवा रस्त्यांची कामे सहा महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.
या पाच उपाययोजना केल्या जाणार...
- एलईडी फलक बसविणे, वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करणे, वाहनांचा वेग ६० किलोमीटरवरून ४० किलोमीटरवर आणणे. वेग मोजण्याची यंत्रणा, कॅमेरे या रस्त्यांवर बसवण्यासह वाहनांच्या बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.