रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:29 IST2025-11-08T13:28:46+5:302025-11-08T13:29:28+5:30
नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौक भोरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले, हे आंदोलन तब्बल 16 तास चालले

रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा
मंचर: पिंपरखेड येथील रोहन विलास बोंबे (वय 13) याच्या मृत्यूनंतर पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौक भोरवाडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवसेना नेते रमेश येवले, माजी सरपंच दत्ता गांजाळे, स्वाभिमानीचे प्रभाकर बांगर यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जनतेचा रोष उफाळून आला. नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौक भोरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन तब्बल 16 तास चालले. प्रशासन आवाहन करत असतानाही पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेण्यात आला. आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये सर्वाधिक वेळ चाललेला रस्ता रोको भोरवाडी येथे झाला. वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन मध्यरात्री दोन वाजता पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर मागे घेण्यात आले.
दरम्यान आता मंचर पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवसेना नेते रमेश येवले, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, माजी सरपंच दत्ता गांजाळे, नरेश ढोमे, शरद बोंबे, सचिन बोंबे, भोलानाथ पडवळ, किरण ढोबळे, दिलीप वाळुंज, रवींद्र वळसे, पूजा वळसे, निलेश वळसे, सुभाष पोकळे, दामू अण्णा घोडे, विकास गायकवाड, कुणाल बाणखेले, विशाल वाबळे, धोंडीभाऊ भोर, बाळासाहेब बाणखेले, नित्यानंद येवले, वनाजी बांगर, अजित चव्हाण, दीपक पोखरकर, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र दाभाडे, विकास वरे, वैभव पोखरकर व इतर 200 ते 250 कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुणे नाशिक महामार्गावर वाहने अडवून लोकसेवक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकाचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करून रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
16 तास रास्ता रोको झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी राज्याच्या वनमंत्र्यांनी लवकरात लवकर आंदोलन स्थळी येऊन गांभीर्याने हा विषय हाताळला असता तर हे आंदोलन एवढा वेळ चाललं नसतं. राज्यकर्ते आणि प्रशासन किती निर्ढावलेला आहे. निष्पाप बालकांचे, नागरिकांचे जीव गेले तरी चालतील परंतु आपली घमेंड,हेकेखोर पणा सोडायचा नाही या प्रवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.- प्रभाकर बांगर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.