नदी, नाल्यालगत हवी विशेष दक्षता

By Admin | Updated: May 29, 2014 05:06 IST2014-05-29T05:06:07+5:302014-05-29T05:06:07+5:30

अतिवृष्टी झाल्यानंतर नाल्यांना व नदीला पूर येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नदीच्या पुरामुळे नाल्यातील पाण्याला फुगवटा येण्याची शक्यता असते

River, Nalayalagalva special skills required | नदी, नाल्यालगत हवी विशेष दक्षता

नदी, नाल्यालगत हवी विशेष दक्षता

पिंपरी : अतिवृष्टी झाल्यानंतर नाल्यांना व नदीला पूर येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नदीच्या पुरामुळे नाल्यातील पाण्याला फुगवटा येण्याची शक्यता असते. पावसाळ्यात महानगरपालिका परिसरातील विशेषत: नदी व नाले यालगत राहणार्‍या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती, आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने यंत्रणा कार्यरत करण्यात येत आहे. त्यासाठी मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष आणि सहा क्षेत्रीय कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ही सर्व यंत्रणा १ जूनपासून कार्यान्वीत करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत नदी व नाल्यांच्या पात्रालगत असलेल्या झोपडया, बांधकामे नागरिकांनी स्वत:हून काढून घ्यावीत. नदीच्या, नाल्यांच्या पात्रातील पाण्याजवळ जाऊ नये. विशेषत: लहान मुलांबाबत दक्षता घ्यावी. टेकडीजवळ किंवा खाणीच्या कड्यानजीकच्या घरांवर, झोपड्यांवर दरडी कोसळण्याची शक्यता असते, अशा परिस्थितीत तेथे बांधकाम करू नये. असे बांधकाम त्वरित काढून घ्यावे. विजेच्या खांबापासून व तुटलेल्या इलेक्ट्रीक तारांपासून सुरक्षित अंतर राखावे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेकडून बाधित भागातील नागरिकांची नजीकच्या मदत केंद्रावर हलविण्याची व्यवस्था केली जाते. तरी अशा प्रसंगी बाधित भागातील नागरिकांनी सहकार्य करावे. रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्यास सावधपणे पायी चालावे, कारण पाण्याखाली ड्रेनेज चेंबरचे झाकण उघडे असण्याची शक्यता असते. पावसामुळे एखादी जुनी इमारत पडावयास झाली असल्यास तात्काळ पूर नियंत्रण कक्ष अगर अग्निशामक दलाशी संपर्क साधावा. पावसापासून बचाव करण्यासाठी जुन्या घरांचा आधार घेणे किंवा कोणत्याही झाडाखाली थांबणे धोक्याचे असते. पाऊस पडत असताना वाहने जपून व सावकाश चालवावित. वरील कोणत्याही बाबीसंदर्भात दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर (२४ तास उपलब्ध) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: River, Nalayalagalva special skills required