राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्व्हर अन् पाच काडतुसे, पुणे विमानतळावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:58 IST2025-09-22T17:58:26+5:302025-09-22T17:58:51+5:30
पुणे ते वाराणसी असा प्रवास करताना नेत्याने परराज्यात पिस्तूल नेण्याची परवानगी स्थानिक पोलिसांकडून न घेतल्यामुळे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्व्हर अन् पाच काडतुसे, पुणे विमानतळावरील घटना
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आल्याची घटना १९ सप्टेंबरला घडली. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असून, बागल हे पुणे ते वाराणसी असा प्रवास करणार होते. मात्र, त्यांनी परराज्यात पिस्तूल नेण्याची परवानगी स्थानिक पोलिसांकडून न घेतल्यामुळे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विमानतळावरील सुरक्षा चौकशीत पिस्तूल आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बागल (६३, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) हे शुक्रवारी (दि. १९) रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर गेले होते. चेक-इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनरमधून केली. त्यावेळी बॅगेत रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे असल्याचे दिसून आले. दरम्यान, बागल यांच्याकडे शस्त्र परवाना असून, तो महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे ते हे शस्त्र घेऊन विमानातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकत नसल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर बागल यांना नोटीस बजावून सोडण्यात आले.