तामिळनाडूच्या साखर उद्योगाला नवसंजीवनी? मुख्यमंत्री स्टॅलिन आणि हर्षवर्धन पाटील यांची महत्त्वपूर्ण भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:21 IST2025-02-10T17:20:34+5:302025-02-10T17:21:12+5:30
सध्या तामिळनाडूमध्ये एकूण १८ सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत.

तामिळनाडूच्या साखर उद्योगाला नवसंजीवनी? मुख्यमंत्री स्टॅलिन आणि हर्षवर्धन पाटील यांची महत्त्वपूर्ण भेट
इंदापूर - तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. रविवारी (दि. ९) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची चेन्नई येथे भेट झाली. या बैठकीत राज्यातील साखर उतारा वाढवणे आणि एफआरपी संदर्भातील अडचणी दूर करण्यावर विशेष चर्चा झाली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासाठी केंद्रीय सहकारिता विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
साखर उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा
या भेटीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांनी तामिळनाडूचे सहकार मंत्री के. आर. पेरियागरुप्पन यांच्यासोबत राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणी आणि विकासाच्या संधी यावर विस्तृत चर्चा केली. तसेच,इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) मार्फत कर्जपुरवठ्याबाबतही चर्चा झाली.
तामिळनाडूमधील १८ सहकारी साखर कारखान्यांना फायदा?
सध्या तामिळनाडूमध्ये एकूण १८ सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यांच्या साखर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि एफआरपी संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
तामिळनाडूच्या साखर उद्योगाला संजीवनी मिळणार?
या भेटीमुळे तामिळनाडूतील साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येत्या काळात राज्य सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तामिळनाडूतील साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळू शकतो.