शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:13 IST2024-08-19T13:13:07+5:302024-08-19T13:13:25+5:30
महामेट्रोच्या खर्चात छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला होता

शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा
पुणे : एसटी प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी गेल्या अनेक वर्षेपासून शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोच्या कामामुळे वाकडेवाडी येेथे हलवण्यात आले होते. तेथील असणारी अपुरी व्यवस्था प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्वीच्या ठिकाणी लवकरच आणावे. यासाठी गेल्या वर्षी एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र अद्याप एसटी प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे एसटी बस स्थानक पूर्ववत जागी येत्या १५ दिवसांत स्थलांतरित केले जावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे.
शिवाजीनगर बसस्थानक लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली असताना त्यानंतर महामेट्रोच्या खर्चात छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला. या निर्णयालाही आता एक वर्ष होऊन सुध्दा याकडे लक्ष नाही. महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे २०१९ मध्ये स्थलांतर करण्यात आले. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली, अद्याप शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू झालेले नाही, प्रवाशांना नाहक मनःस्ताप दिला जात आहे. यंदा तर, पावसाळ्यात स्थानकात आणि स्थानकाबाहेर पाण्याचे तळे साचते. त्यातून प्रवाशांना ये-जा करावी लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यावेळी एसटी स्थानक पूर्वीच्याच जागी आणण्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही. याकरिता परिवहन खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे रविवारी माहिती दिली आहे.