शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:00 IST2025-02-25T18:59:51+5:302025-02-25T19:00:29+5:30
६ ते ८ वीच्या २० पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले

शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन
बारामती : राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील संच मान्यतेमधील त्रुटी दूर करण्यासाठी तोडगा काढू,असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई येथे भेट घेतली, १५ मार्च २०२४ रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यतेत दुरुस्ती करावी,अशी आग्रही मागणी केली. यावेळी सुधारित संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेले शिक्षक व त्याचा पुढील काळात शाळेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबतची माहिती शिक्षण मंत्री यांना देण्यात आली.
राज्यभरातील शाळांमध्ये सुधारित संच मान्यतेमुळे झालेले परिणाम समजून घेऊन आवश्यक निर्णय तातडीने घेऊ असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच आधार कार्ड व्हॅलिड बाबत तहसीलदार यांच्याकडून उपाय योजना केली जाईल व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची खात्री करून संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ६ ते ८ वीच्या २० पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले.