निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:06 IST2025-07-07T17:05:23+5:302025-07-07T17:06:32+5:30
काँग्रेस कधीही कोणत्याही धर्माच्या उत्सवाच्या विरोधात नाही, त्यामुळे काँग्रेसचा पदाधिकारी असलो तरी अशी मागणी करण्यात मला काहीही गैर वाटत नाही.

निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी
पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढवणाऱ्या ढोल पथकांना सरावासाठी अधिकृतपणे जागा द्यावी, तसेच त्यांच्या वाद्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली. मागील वर्षी मुठेला आलेल्या पुरात पथकांची वाद्ये वाहून गेली होती, तसेच सरावासाठी जागा नसल्याने शहराच्या निवासी वस्त्यांमध्ये त्यांना सराव करावा लागला.
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले. मागील काही वर्षांत पुण्यातील युवकांनी गणेश विसर्जन मिरवणुकीचा चेहरामोहरा बदलला आहे. महाराष्ट्राच्या मातीतील ढोल ताशा, झांज, लेझीम अशा खेळांना मिरवणुकीत वाव मिळतो आहे. त्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गणेश उत्सवाच्या आधी महिनाभर ही पथके सराव करीत असतात.
मात्र, सरावासाठी त्यांना जागा नसते. त्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये असलेल्या जागेत ते सराव करतात. परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे महापालिकेने नदीपात्रातील जागेत अधिकृतपणे गाळे तयार करावेत व तिथे त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. वेळ ठरवून द्यावी. हवे असेल तर महापालिकेने त्यासाठी जुजबी शुल्क घ्यावे. असे केल्याने पथकांना अधिकृत जागा मिळेल. मागील वर्षी पुरामुळे अनेक पथकांची वाद्ये वाहून गेली. ढोल, ताशे महागडे असतात. ते खराब झाल्याने पथकांना ते नव्याने विकत घ्यावे लागले. ही बाब त्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे त्यांची वाद्य ठेवण्यासाठी म्हणून महापालिका प्रशासन त्यांना शाळांच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकते असे तिवारी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये सुचवले आहे.
निवासी वस्त्यांमध्ये दररोज सराव होत असल्याने त्याचा रहिवाशांना त्रास होतो. काँग्रेस कधीही कोणत्याही धर्माच्या उत्सवाच्या विरोधात नाही. त्यामुळे काँग्रेसचा पदाधिकारी असलो तरी अशी मागणी करण्यात मला काहीही गैर वाटत नाही. उलट पथकांच्या वादनामुळे विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढते. महाराष्ट्राची वाद्य संस्कृती जपणाऱ्या या पथकांना सरावासाठी अधिकृतपणे जागा उपलब्ध करून देणे, त्यांच्या वाद्यांना सुरक्षा पुरवणे महापालिकेचे कर्तव्यच आहे.- गोपाळ तिवारी, प्रदेश प्रवक्ता, काँग्रेस