विलासरावांच्या आठवणीत रमले पुणेकर

By Admin | Updated: May 24, 2015 00:35 IST2015-05-24T00:35:11+5:302015-05-24T00:35:11+5:30

तमाशा पाहण्यात रमणारा रसिक... अशा अनेक आठवणींतून शनिवारी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विविध पैलू उलगडत गेले.

Recently, Puneakar, remembered Vilasrao | विलासरावांच्या आठवणीत रमले पुणेकर

विलासरावांच्या आठवणीत रमले पुणेकर

पुणे : राजकारणापासून समाजकारण, सांस्कृतिक यांसह विविध क्षेत्रांत उमटवलेला ठसा, पुण्यातील कट्ट्यावर जमलेली गप्पांची मैफल, मैफलीत तबल्यावर धरलेला ठेका, सत्ता जाण्याचे कसलेली दडपण न घेता तमाशा पाहण्यात रमणारा रसिक... अशा अनेक आठवणींतून शनिवारी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विविध पैलू उलगडत गेले.
निमित्त होते देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ््याचे. ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, कवयित्री अरुणा ढेरे व निवेदक सुधीर गाडगीळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, अ‍ॅड. शशिकांत पागे, नरेंद्र व्यवहारे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की सरपंचपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतची विलासरावांची वाटचाल थक्क करणारी आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी माणसे जोडली. उत्तम वक्तृत्व शैलीमुळे त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गाडगीळ यांनी विलासराव पुण्यात आल्यानंतर कट्ट्यावरील आठवणींना उजाळा दिला. खऱ्या अर्थाने सांस्कृतिकता जपलेला मंत्री महाराष्ट्राला लाभल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ््यानंतर प्रमोद रानडे, दयानंद घोटकर व सहकाऱ्यांनी ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम सादर केला.

राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा ज्यांनी घडविला त्यामध्ये विलासराव देशमुख अग्रभागी होते. त्यांना राजकारणाबरोबर समाजकारणाचेही तितकेच भान होते. शांताबाई शेळके यांच्यासोबत रंगलेल्या गप्पांच्या मैफल आजही स्मरणात आहेत. - अरुणा ढेरे
माझ्यासह कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर आणि विलासराव देशमुख अशी चौघांची मैफल रंगली. त्यात विलासरावांनी तबला वाजवून इतरांना साथ दिली. मुख्यमंत्र्यांपेक्षा एका रसिक व संगीताचे जाणकार म्हणून त्यांच्याशी परिचय होता.
- श्रीधर फडके

Web Title: Recently, Puneakar, remembered Vilasrao