Pune By-Election: रवींद्र धंगेकर नशीबवान; उमेदवारी अर्ज दाखल करताना ३ माजी मुख्यमंत्री होते हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:51 AM2023-02-08T11:51:33+5:302023-02-08T12:20:32+5:30

काँग्रेसच्या शहर शाखेच्या कार्यक्रमाला राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती म्हणजे दुर्लभ योग

Ravindra Dhangekar lucky 3 former Chief Ministers were present while filing nomination papers | Pune By-Election: रवींद्र धंगेकर नशीबवान; उमेदवारी अर्ज दाखल करताना ३ माजी मुख्यमंत्री होते हजर

Pune By-Election: रवींद्र धंगेकर नशीबवान; उमेदवारी अर्ज दाखल करताना ३ माजी मुख्यमंत्री होते हजर

googlenewsNext

राजू इनामदार 

- काँग्रेसच्या शहर शाखेच्या कार्यक्रमाला राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती म्हणजे दुर्लभ योग. महाविकास आघाडीचे कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर मात्र नशीबवान ठरले. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आघाडीतील पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी तर होतेच, पण काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण असे तीन माजी मुख्यमंत्री हजर होते. शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे हेही होते. धंगेकर यांच्यासाठी तर तो दुग्धशर्करा योग होताच; पण काँग्रेससाठी ही कपिलाषष्ठीच होती.

एकाचवेळी तीन माजी मुख्यमंत्री आणि इतके नेते. काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते त्यादिवशी खुश होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे तर जास्तच. कारण त्यांच्या कारकीर्दीत हे घडले होते. त्याचा उपयोग कसा करायचा याचे चिंतन बहुधा त्यांनी आधीच केले असावे. जसे या माजी मुख्यमंत्र्यांचे येणे निश्चित झाले तसे काँग्रेसच्या शहर शाखेचे एक आंदोलनही निश्चित झाले.

शेअर बाजारातील घसरगुंडी, त्यावरून एक मोठा उद्योगसमूह व भाजपच्या केंद्र सरकारवर होत असलेली टीका. निमित्त तर छान होते; पण मिरवणुकीने दाखल करायचा उमेदवारी अर्ज व आंदोलनाची वेळ साधायची कशी? एरवी काँग्रेसची सगळी आंदोलने सकाळी ११ वगैरे वाजता होतात; पण अर्ज दाखल करण्याची वेळही तीच, मग आंदोलनाची वेळ ठरली दुपारची. उमेदवारी अर्ज दाखल करायचा सोपस्कार संपल्यानंतरची.

माजी मुख्यमंत्र्यांनीही ते मान्य केले. त्यामुळे बाकीचे नेतेही हो म्हणाले. आणि मग बऱ्याच महिन्यांनी न. चिं. केळकर चौकात ऐन निवडणुकीच्या हंगामात काँग्रेसचे एक मोठे आंदोलन शहरात झाले.

कसब्यातील पहिल्या महिला आमदार

दिवंगत आमदार मुक्ता टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघातील पहिल्याच महिला आमदार नाहीत. त्यांच्याआधी काँग्रेसच्या लीलाताई मर्चंट यांनी महिला आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांना सन १९७२ मध्ये या मतदारसंघात उमेदवारी दिली होती. त्या निवडूनही आल्या होत्या. आमदार म्हणून त्यांनी फार चांगले काम केले. त्या मूळच्या तळेगाव ढमढेरे येथील. जैन समाजातील. लग्न झाल्यानंतर अमळनेरला सासरी गेल्या. तिथे त्यांचा साने गुरुजींबरोबर संपर्क आला. त्या गांधीवादी झाल्या. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाल्या. पुढे त्यांनी आयुष्यभर खादीचाच वापर केला. सामाजिक कार्यामुळे त्या नंतरच्या काळात गुरुजींच्या मानसकन्याच झाल्या. पुढे त्यांच्या सासरचे सगळे पुण्यात आले. पुण्यातही त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून बुधवार पेठेसारख्या ठिकाणी सामाजिक काम सुरू केले. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर काँग्रेसकडून थेट इंदिरा गांधी यांनीच त्यांना सन १९७२ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची उमेदवारी दिली. त्या आमदार झाल्याही. त्यांचा जन्म २४ मार्च १९२४. अलीकडेच म्हणजे वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Web Title: Ravindra Dhangekar lucky 3 former Chief Ministers were present while filing nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.