पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यातील काही रुग्णांचे लघवी आणि रक्ताचे नमुने (सॅम्पल) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने आरोग्य विभागाला पाठविला असून, यामध्ये ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ या जीवाणू आणि ‘नोरो व्हायरस’ या विषाणूमुळे दुर्मीळ ‘जीबीएस’ची बाधा झाल्याचे आता उघड झाले आहे.
जीबीएस रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. या अहवालात मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही रुग्णांना ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये ‘नोरो व्हायरस’ हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. ‘जीबीएस’चा सर्व्हे आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे शहरातील १९४३, पिंपरी-चिंचवड मनपा १७५० आणि ग्रामीण भागातील ३५२२ घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता उघड्यावरील कोणतेही अन्न खाऊ नये. तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
जगभरात दरवर्षी १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. या संसगार्मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून, हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला, तरी बाधित रुग्णाने उलटी केल्यास हा विषाणू हवेत पसरून त्याचा संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण एक ते तीन दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अशी आहे रुग्णांची आकडेवारी
पुणे महापालिका - ११पिंपरी-चिंचवड - १५ग्रामीण - ४४इतर जिल्ह्यातील - ३
गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या. - डॉ. परेश बाबेल, सल्लागार, एबीएमएच येथील न्यूरोलॉजिस्ट
योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणेदेखील होऊ शकतात.- एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय