रामाचा मुलगा हरवला, सद्दाम खान देवदूतासारखा धावून आला! पोलिसांनी दाखवली मानवतेची खरी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:15 IST2025-10-29T13:14:11+5:302025-10-29T13:15:13+5:30
रिक्षाचालक सद्दाम अकबर खान यांना कारेगाव भागात एक हरवलेला मुलगा रडत भटकताना दिसला. नाव-गाव काहीच न सांगू शकणाऱ्या त्या मुलाची काळजी घेत सद्दाम यांनी तो थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणला.

रामाचा मुलगा हरवला, सद्दाम खान देवदूतासारखा धावून आला! पोलिसांनी दाखवली मानवतेची खरी ओळख
पुणे : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी घडलेला घटनेची सध्या शिरूर तालुक्यात चर्चा आहे. तीन वर्षांचा हरवलेला चिमुकला मटरु आईच्या कुशीत सुखरूप परतला, आणि त्या क्षणी पोलिस ठाण्यातील सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. शिरुरमधील रिक्षाचालक सद्दाम अकबर खान यांना कारेगाव भागात एक हरवलेला मुलगा रडत भटकताना दिसला. नाव-गाव काहीच न सांगू शकणाऱ्या त्या मुलाची काळजी घेत सद्दाम यांनी तो थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणला.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिस कर्मचारी वैजनाथ नागरगोजे, आकाश सवाने, संदीप भांड, योगेश गुंड, तसेच महिला अंमलदार शितल रौंधळ आणि पुजा नाणेकर यांनी परिसरात शोध घेतला आणि सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडिओ प्रसारित केला. काही तासांतच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि संध्याकाळी कारेगावमधील दिव्यभारती राम खिलारी पोलिस ठाण्यात पोहोचल्या. आपल्या मुलाला पाहताच त्या धावत गेल्या आणि “हा माझा मुलगा मटरु!” असं म्हणत त्याला घट्ट मिठी मारली. ठाण्यातील सगळेच गहिवरले. या घटनेनंतर रांजणगाव पोलिस आणि सद्दाम खान यांच्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस फक्त कायदा पाळणारे नाहीत, तर माणुसकी जपणारेही आहेत, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झालं."