हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:50 IST2025-05-28T20:49:36+5:302025-05-28T20:50:19+5:30
मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली

हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली. तर आरोपींच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला.
हुंड्यासाठी छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (२७), सासू लता राजेंद्र हगवणे (५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (६३) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे (२७) यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २८) संपली. त्यामुळे पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नीलेश चव्हाणचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. तर लता, करिष्मा व सुशील हगवणे यांच्या मोबाईलचा देखील शोध सुरू आहे. चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेजेस हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांक याने त्यांना पाच आणि तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्याराने मारहाण केली आहे. त्याने आणखी कोणत्या हत्याराने मारहाण केली याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे आहे. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसांची तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.
सोन्याबाबची माहिती स्वतः पोलिसांना दिली : बचाव पक्ष
सोन्याबाबतची सर्व माहिती यापूर्वीच आरोपींनी स्वतःहून पोलिसांना दिली आहे. व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. आपले सोने काढून घेतल्याची तक्रार वैष्णवी यांनी केलेली नाही. त्यांचे एका तरूणासोबतचे चॅटिंग शशांक यांना मिळाले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले होते, याबाबत तपास पोलिसांनी केलेला नाही, असा युक्तिवाद ॲड. दुशिंग यांनी केला.
हगवणे कुटुंबीयांच्या पोलिस कोठडीत वाढ
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीत एक दिवस तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
यांना मिळाला जामीन..
फरार झालेला दीर आणि सासरा यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे.
वैष्णवी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे
एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद हगवणे यांच्या वकिलांनी केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातुनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, असेही वकिलांनी सांगितले.