आळंदीत पावसाचा जोर वाढला; भाविकांना इंद्रायणी पात्रात स्नानासाठी न उतरण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:35 IST2025-06-19T10:35:18+5:302025-06-19T10:35:45+5:30

जाधववाडी तलाव ९५ टक्के भरल्याने इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याने विशेषत: देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

Rains intensify in Alandi; Devotees advised not to bathe in Indrayani water tank | आळंदीत पावसाचा जोर वाढला; भाविकांना इंद्रायणी पात्रात स्नानासाठी न उतरण्याच्या सूचना

आळंदीत पावसाचा जोर वाढला; भाविकांना इंद्रायणी पात्रात स्नानासाठी न उतरण्याच्या सूचना

भानुदास पऱ्हाड
 
आळंदी
: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढीपायवारी पालखी आज (दि. १९) रात्री आठनंतर देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला आहे. अलंकापुरी दाखल झालेला प्रत्येक वारकरी पवित्र इंद्रायणीनदीत स्नान करून माऊलींचे दर्शन घेत आहे. मात्र मागील २४ तासांपासून आळंदीसहइंद्रायणीनदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी पवित्र इंद्रायणी नदीचे दोन्ही पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे अलंकापुरीत आलेल्या अनेक भाविकांना पालखी प्रस्थानाच्या शुभसकाळी इंद्रायणी नदीच्या स्नानापासून वंचित राहावे लागले आहे. इंद्रायणी नदी केव्हाही धोक्याची पातळी ओलांडू शकते ही शक्यता लक्षात घेऊन वारकऱ्यांनी इंद्रायणीत उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
          
इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून वरूणराजा बरसत आहे. मात्र गुरुवारी रात्रीपासून सर्वत्रच पावसाचा जोर वाढला आहे. विशेषत: मावळसह लोणावळा परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. या भागातील बहुतांश तलाव, ओढे, नद्यांचे तुडुंब भरलेले पाणी इंद्रायणी नदीला येऊन मिळत असल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत आळंदीतील भक्ती सोपान फुलाला पाणी लागलेले नाही. मात्र पावसाचा वेग कायम राहिल्यास पुढील दोन - अडीच तासात पूल पाण्याखाली जाऊ शकतो.
         
दरम्यान जाधववाडी तलाव ९५ टक्के भरल्याने इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषत: देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. संबंधित नगरपालिका आणि महापालिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

Web Title: Rains intensify in Alandi; Devotees advised not to bathe in Indrayani water tank