पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी; झेंडू, चवळी, फ्लॉवर व फरसबीचे प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:09 IST2025-10-02T14:09:21+5:302025-10-02T14:09:30+5:30
- झेंडू, चवळी, फ्लॉवर आणि फरसबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी; झेंडू, चवळी, फ्लॉवर व फरसबीचे प्रचंड नुकसान
ओतूर : माळशेज परिसरातील ओतूर येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांवर सततच्या रिमझिम पावसाने आणि मधेच येणाऱ्या धुक्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः झेंडू, चवळी, फ्लॉवर आणि फरसबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.
ओतूर येथील शेतकरी मनोज गोपाळ डुंबरे यांच्या शेतातील सुमारे एक एकर झेंडू, ३० गुंठे चवळी, ३० गुंठे फ्लॉवर आणि ३० गुंठे फरसबी या पिकांचे जवळपास पूर्ण नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे पिके जमिनीतच कुजून गेली आहेत. लागवडीपासून रात्रंदिवस मेहनत घेऊन उभे केलेले पीक आता उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. माळशेज परिसरातील अनेक शेतकऱ्यांची अशीच अवस्था झाली असून, त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गोगलगायींचा उपद्रव आणि पावसाचा दणका
याआधी संथ गतीने पडणाऱ्या पावसामुळे शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला होता. या गोगलगायींनी तब्बल ८० टक्के पीक नष्ट केले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि आर्थिक जुळवाजुळव करून पुन्हा लागवड केली होती. नव्या पिकातून काही उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांनी बाळगली होती. मात्र, सततच्या पावसाने त्यांचे हे स्वप्नही भंगले. पावसाने हाताशी आलेले सोन्यासारखे पीक हिरावून घेतले आहे.
दिवाळीच्या आनंदावर काळोख
दिवाळी हा सण शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा असतो, कारण या काळात झेंडूसारख्या फुलांच्या पिकांना बाजारात मोठी मागणी असते. मात्र, यंदा पावसाने शेतकऱ्यांच्या या आनंदावर पाणी फेरले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडले आहेत. "सण-वार आनंदाने साजरा करायचा की कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, याच चिंतेत आम्ही आहोत," असे मनोज डुंबरे यांनी सांगितले. परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही हीच व्यथा आहे.
शेतकऱ्यांचे आव्हान आणि अपेक्षा
शेतकऱ्यांना सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे आर्थिक अडचणी. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, भांडवल जमा करून पिकांची लागवड केली होती. मात्र, आता उत्पन्नाऐवजी नुकसानच पदरी पडले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडून तातडीने नुकसानभरपाई आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे. "आम्हाला तातडीने मदत मिळाली नाही, तर पुढील हंगामासाठी लागवड करणेही कठीण होईल," असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. माळशेज परिसरातील शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेले नुकसान हे केवळ आर्थिक नुकसान नसून, त्यांच्या मेहनतीवर आणि आशांवर झालेला आघात आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने पाऊले उचलून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा, येत्या काळात शेतकऱ्यांचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.