पुणे : हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. राज्यातदेखील पुढील आठवडाभर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, दि. 21 व 22 मे रोजी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या अंदाजामुळे केरळ, तसेच महाराष्ट्रातदेखील मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालचा उपसागर, तसेच अरबी समुद्रातदेखील हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. सर्व भागातून येत असलेले आर्द्रतायुक्त वारे आणि दुपारपर्यंत उन्हामुळे निर्माण झालेले बाष्प याच्या संयोगातून राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, सिक्किम, आसाम या राज्यात मुसळधार पाऊस झाला, तर पश्चिम किनापट्टी, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली,पंजाब, हरियाणा,पूर्वोत्तर राज्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस नोंदविण्यात आला.
दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यातदेखील पाऊस राहणार आहे. त्यात ही 20, 21 व 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दि. ३१ मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अशा चौदा जिल्ह्यांत मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.