ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:15 IST2025-08-10T13:14:47+5:302025-08-10T13:15:15+5:30
ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार

ऊस दर पाडण्यासाठीच अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष; रघुनाथ पाटील यांचा आरोप
भिगवण: “महाराष्ट्रात ऊस कारखाने वाढत असले तरी साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ऊस दर पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरावर होणार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला.
डिकसळ (ता. इंदापूर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषद शनिवारी पार पडली. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रघुनाथ पाटील म्हणाले, ‘‘२००९-१० मध्ये उसाला दुप्पट भाव मिळत होता, पण गेल्या १७ वर्षांत ऊस दर स्थिर आहे. सरकारने उसाला योग्य भाव द्यावा किंवा दोन कारखान्यांमधील अंतर कमी करावे, जेणेकरून शेतकरी दुसऱ्या कारखान्यांकडून चांगला भाव मिळवू शकतील,” अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे, २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेल्या गोवंश हत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. “अनावश्यक जनावरे विकली जाऊ शकत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दहा वर्षांपूर्वी शेतीमालाला चांगला भाव मिळत होता. दुधातील भेसळ थांबवली तर दुधाला योग्य दर मिळू शकतो. मात्र, सरकारने भेसळ रोखण्यासाठी बनवलेला कायदा भेसळ करणाऱ्यांना पैसे भरून सुटका करून देणारा आहे,” अशी टीका त्यांनी केली. यासोबतच, त्यांनी एक लीटर गायीच्या दुधाच्या बदल्यात एक लीटर डिझेल आणि एक लीटर म्हशीच्या दुधाच्या बदल्यात एक लीटर पेट्रोल देण्याची मागणी केली.
आंदोलनाचा इशारा
ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केले.