Purandar Airport : प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील व्यवहारांची होणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:51 IST2025-10-09T09:46:25+5:302025-10-09T09:51:38+5:30
प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली

Purandar Airport : प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील व्यवहारांची होणार तपासणी
पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरातील जमिनींना सोन्याचे दर मिळू लागले आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेत काही जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या सुमारे तीन हजार एकर जमिनीवर विमानतळ उभारण्यात येणार आहे. सध्या या जमिनींची मोजणी सुरू असून, ती १७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे जमिनींची खरेदी-विक्री झाल्याने एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अशा प्रकारच्या तीन तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून, आणखी काही प्रकरणे आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये काही महसूल अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी डुडी यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विमानतळाची घोषणा होताच काहींनी बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आणि सातबारा उताऱ्यावरही त्याची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या जमिनी अन्य व्यक्तींना विकल्या गेल्या असून, त्यांच्या नावाने खोटे आधारकार्ड तयार करून सातबारा नोंदी बदलण्यात आल्याचेही समोर आले आहे. सध्या अशा तीन प्रकरणांवर तपास सुरू असून, आणखी काही प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.
खोटी कागदपत्रे सादर करून जमीन खरेदी-विक्रीची तीन प्रकरणे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्यवहारांची शक्यता आहे. पोलिसांमार्फत याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक झालेली प्रकरणे आम्ही सुधारू. सातबारा उताऱ्यांतील चुकीच्या नोंदी दुरुस्त करून मूळ शेतकऱ्यांच्या नावे परत नोंद केली जाईल. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी