Pune City: पुण्यातील रस्ते झाले चकाचक; विसर्जन मिरवणूक रस्त्यांवरून ७०० टन कचरा संकलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:19 IST2025-09-09T18:19:02+5:302025-09-09T18:19:21+5:30
कचऱ्यात ३०.९६ टन डेकोरेशनचे साहित्य व १.६ टन चपला व बुटांचा समावेश आहे

Pune City: पुण्यातील रस्ते झाले चकाचक; विसर्जन मिरवणूक रस्त्यांवरून ७०० टन कचरा संकलन
पुणे: शहरातील गणेशोत्सवाची सांगता दोन दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीनंतर काही वेळातच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मिरवणूक मार्ग (रस्ते) चकाचक केले. यासाठी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत विविध मिरवणूक मार्गावरून तब्बल ७०६ टन कचरा संकलित झाला. यामध्ये १.६ टन चपला व बूट आणि ३१ टन डेकोरेशन साहित्यचा समावेश आहे.
शहरातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता शनिवार व रविवारी अशी दोन दिवसीय विसर्जन मिरवणुकीने मोठ्या उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात झाली. या मिरवणुकीसाठी महापालिकेने विविध स्तरांवर तयारी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून विसर्जन मार्गाची स्वच्छता करण्यासाठी दोन ते अडीच हजार सफाई सेवकांची नेमणूक केली होती. यामध्ये इतर स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
या सर्व स्वच्छता कर्मचारी व स्वयंसेवकांनी लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, नारायण पेठ रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, अलका चौक, खंडुजी बाबा चौक, कर्वे रोड, जंगली महाराज रोड, सेनापती बापट रोड, गणेशखिंड रोड, फर्ग्युसन महाविद्यालय रोड, प्रभात रोड, भांडारकर रोड, पुणे-मुंबई रोड या मुख्य विसर्जन मार्गांवर स्वच्छता मोहीम राबवून ७०६ टन कचरा संकलित केला. यामध्ये ४२० टन ओला कचरा, २८६ टन सुका कचरा, ३०.९६ टन डेकोरेशनचे साहित्य व १.६ टन चपला व बुटांचा समावेश आहे, अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.